सराटी : उन्हाच्या तडाख्यातील सोमवारची इंदापूर ते सराटी वाटचाल थकवणारी असली, तरीही त्याहून अधिक प्रखर संतांची आणि भक्तीची ऊर्जा वारीत दिसून आली. आज २४ किलोमीटरचा टप्पा होता. या उर्जेचा अनुभव घेत, पालखी सोहळा सराटी येथे सायंकाळी पोचला. त्यावेळी समाजआरती होऊन सोहळा विसावला.
इंदापूर येथे रविवारी रात्री पालखी तळावर कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शेजारती सुरू झाली. हभप पुंडलिक महाराज देहूकर, नामदेव चोपदार गिराम, पखवाज वादक टाळकरी मंडळी उपस्थित होते. ‘तुकाराम तुकाराम’ अखंड भजन झाले. पालखीतील पादुका मंडपात आणल्या. पादुकांना अभिषेक झाला. ‘कणकाचे परियळ उजळोणी’ या मानाच्या अभंगाने वातावरण भारून गेले.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची आरती झाली. संतांच्या छत्र छायेत नामस्मरणात हरवून जाण्याचा अद्वितीय अनुभव मिळाला. अशा क्षणांतून शांती आणि नवचैतन्य निर्माण झाले. काकड आरतीनंतर सोमवारी पहाटे संस्थान आणि इंदापूर ग्रामस्थांनी पादुकांना अभिषेक घातला आणि सकाळी सहा वाजता सोहळा मार्गस्थ झाला. गोकुळीचा ओढा (विठ्ठलवाडी), वडापुरी येथे शेतकऱ्यांनी वारकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. येथील विसावा घेत सुमारे बाराच्या सुमारास सुरवड येथे पालखी दाखल झाली.
त्यापुढे श्रीविठ्ठल आणि संत तुकाराम महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या हभप शेरकरबाबा महाराज समाधी मंदिरासमोर रथ थांबला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची आरती झाली. वरुणराजाने हजेरी लावली. सोहळा वकील वस्तीला पोचला. पालखीवर पुष्पवृष्टी केली. बावडा गावाच्या वेशीवर गावकऱ्यांनी पालखी खांद्यावर घेऊन चौकात दर्शनासाठी ठेवली.
परिसरातील गावांतील भाविकांनी गर्दी केली होती. पुन्हा पावसाने शिडकावा केला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबीयांनी संस्थानच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा फेटा, हार, नारळ देऊन सत्कार केला. सोहळा पाच वाजता मार्गस्थ झाला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालखी सराटीत पोहोचली. येथे समाजआरतीनंतर विसावा घेतला.
आज नीरा स्नान अन् गोल रिंगणपुणे जिल्ह्यातील सराटी आणि सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावांच्या सीमेवरील नीरा नदीमध्ये मंगळवारी (ता.१) सकाळी संत तुकोबारायांच्या पादुकांचे ‘स्नान’ होईल. त्यानंतर सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. अकलूज येथील माने विद्यालयाच्या पटांगणावर सकाळी दहाच्या सुमारास तिसरे गोल रिंगण होईल आणि सोहळा अकलूज येथेच मुक्कामी थांबणार आहे.