टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होणार आहे. 2026 चा टी20 वर्ल्डकप 10 फेब्रुवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेचा उद्घाटन सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे आणि पहिल्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. कारण मागच्या पर्वात भारताने दक्षिण अफ्रिकेला नमवून जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे हे दोन्ही संघ स्पर्धेच्या सुरुवातीला आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 27 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामना 12 मार्च रोजी कोलकाता किंवा कोलंबो येथील ईडन गार्डन्सवर होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार असून त्यापैकी 13 संघांची नावं निश्चित झाली आहेत .आता सात जागांसाठी 22 संघ मैदानात उतरले आहेत. पात्रता फेरीतील लढतीनंतर 15 संघ बाद होतील आणि त्यापैकी 7 संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळतील.
सध्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण अफ्रिका, अमेरिका आणि कॅनडा हे संघ ठरले आहेत. यात अफ्रिकन खंडातील दोन देशांची भर पडेल. अफ्रिका प्रादेशिक पात्रता फेरीत भाग घेणाऱ्या आठ संघांपैकी दोन संघ आगामी टी20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील. यात बोत्स्वाना, केनिया, मलावी, नामिबिया, नायझेरिया, टान्झानिया, युगांडा आणि झिम्बाब्वे या संघात चुरस असेल.
आशिया/पूर्व आशिया-पॅसिफिक प्रादेशिक पात्रता फेरीत भाग घेणाऱ्या नऊ संघांपैकी तीन संघांना आगामी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. यात जापान, कुवेत, मलेशिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, कतार, सामोआ, युएई या संघापैकी तीन संघ निवडले जातील.
युरोपियन प्रादेशिक पात्रता फेरीत सहभागी होणाऱ्या पाच संघांपैकी दोन संघ टी 20 विश्वचषकात सहभागी होतील. यात ग्वेर्नसी, इटली, जर्सी, नेदरलँड आणि स्कॉटलँडचा समावेश आहे. या पाच संघांपैकी नेदरलँड्स आणि स्कॉटलंड या संघांची आगामी विश्वचषकात निवड होण्याची दाट शक्यता आहे.