CM Devendra Fadnavis : अधिक व्याजाच्या योजनांविरोधात विशेष मोहीम; नागरिकांनी अशा योजनांना बळी पडू नये
esakal July 02, 2025 05:45 AM

मुंबई - ‘अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आर्थिक गुप्तचर विभाग कार्यरत केला असून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केले.

विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी राज्यात गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सदस्य नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी यावर उपप्रश्न विचारत चर्चेत सहभाग घेतला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नागरिकांनी गुंतवणूक करताना संबंधित संस्थेकडे आवश्यक परवाने, नोंदणी व अधिकृत मंजुरी आहे की नाही, याची खातरजमा करावी.

कोणतेही अतिरिक्त लाभाचे किंवा अधिक व्याजाचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून दूर राहावे,’ असे आवाहन केले. अशा योजनांमार्फत फसवणुकीचे प्रकार घडू नयेत यासाठी आर्थिक गुप्तचर विभाग कार्यरत करण्यात आले असून, संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे.

‘टोरस’वर मालमत्ता जप्तीची कारवाई

टोरस कंपनीविरोधात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणी सरकारने कारवाई सुरू केली असून, मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (वित्तीय आस्थापने)(एमपीआयडी) कायद्यान्वये कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

प्रकरण जलदगती न्यायालयात

मुंब्रा येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि तिची निर्घृण हत्या ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी याबद्दल प्रश्न विचारला होता. या गुन्ह्यातील आरोपीस अटक केली असून त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायवैद्यक तपास अहवाल निश्चित वेळेत मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत, असे कदम यांनी स्पष्ट केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.