इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. त्यांनतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार बेन स्टोक्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला असता तर फिल्डिंगचाच निर्णय घेतला असता, असं शुबमनने म्हटलं.
भारतीय क्रिकेट संघात पहिल्या पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित समजलं जात होतं. त्यानुसार अंतिम 11 खेळाडूंमध्ये 3 बदल केले गेले आहेत. साई सुदर्शन, शार्दुल ठाकुर या दोघांना डच्चू देण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनजेमेंटमुळे खेळत नाही. बुमराहच्या जागी आकाश दीप याचा समावेश करण्यात आला आहे. तर वॉशिंग्टन सुंदर याला साई सुदर्शन याच्या जागी संधी मिळाली आहे. तर नितीश कुमार रेड्डी याला शार्दूलच्या जागी संघात घेतलं गेलं आहे.
साई सुदर्शनला डच्चू दिल्याचा परिणाम हा करुण नायर याच्यावर झाला आहे.साई नसल्याने करुणला या सामन्यात तिसऱ्या स्थानी बॅटिंगला यावं लागणार आहे. करुण पहिल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळला होता. आता करुण वनडाऊन म्हणून कशी कामगिरी करतो? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आम्हाला पहिल्या कसोटीतील पाचव्या दिवशी दुसऱ्या फिरकी गोलंदाजाची उणीव भासली, असं कर्णधार शुबमन दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत म्हणाला.त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ 2 फिरकीपटूंसह उतरणार असल्याचं निश्चित झालं होतं. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या दोघांपैकी फिरकीपटू म्हणून ऑलराउंडर रवींद्र जडेजा याची साथ देण्याची कुणाला संधी मिळणार? हा प्रश्न होता. मात्र टीम मॅनेजमेंटने वॉशिंग्टनवर विश्वास दाखवला. त्यामुळे कुलदीपला इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
टीम इंडिया दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.