धाराशिव : नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखाधिकार्याने सोलापूरकडे रक्कम घेऊन जाताना लुटल्याचा बनाव करत २५ लाख हडप केल्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अवघ्या २४ तासात पोलिसांनी या घटनेचा छडा लावला.
दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यानी डोळ्यात मिरची टाकून २५ लाख पळविले म्हणून पोलिसांना सांगणारा लोकमंगल को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा शाखाधिकारी कैलास घाटे यांने बनाव करून स्वतःच्या फायद्यासाठी २५ लाख रुपये स्वतःजवळच ठेवल्याचे उघड झाले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की. नळदुर्ग येथील लोकमंगल को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा शाखाधिकारी कैलास घाटे पोलिसांना सांगितले होते की ३० जून रोजी सायंकाळी एम एच १३-बीयु-५०१९ या दुचाकीवरून २५ लाख रुपये कॅश सोलापुर येथील मुख्य कार्यालयात भरण्यासाठी जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापूर- हैदराबाद रोड वरील चापला तांडा जवळ पाठीमागून येणाऱ्या दुचाकी वरील दोघांनी घाटे यांना ओव्हरटेक केल्यानंतर घाटे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.
डोळ्यात मिरची गेल्यामुळे घाटे यांनी लगेच गाडी थांबवली असता दुचाकी वरील दोघांनी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र घाटे यांनी प्रतिकार करण्यास सुरुवात केली असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने छाती, पाठी व उजव्या खांद्यावर वार केले व २५ लाख रुपये कॅश असलेले बॅग घेऊन त्या चोरट्याने पळ काढल्याचे घाटे यांने सांगितल्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली.
जखमी कैलास घाटे यांच्यावर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगूने, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे व त्यांची टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक इजपतवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार, मोरे ,कटके व त्यांच्या टीमने तपासाची सूत्रे हलविण्यास सुरुवात केली असता शाकाधिकारी कैलास घाटे यांने सांगितलेल्या जवाबात विसंगती आढळून येत असल्याने शाखाधिकारी कैलास घाटे याची कसून चौकशी केली असता त्याने स्वतःच्या फायद्यासाठी २५ लाख रुपये स्वतःजवळच ठेवून घेतला व दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मिरची टाकून तसेच धारदार शस्त्राने वार करून २५ लाख रुपये पळविल्याचा बनाव केल्याची कबुली कैलास घाटे यांने रात्री पोलिसांसमोर दिली. तसेच अज्ञात चोरट्यांनी नव्हे तर स्वतःच अंगावर वार करून घेतल्याचे देखील कबूल केले आहे. याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का याची चौकशी पोलीस करीत आहेत.