Sangli Police News : सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आता ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्याचा एक भाग म्हणून रेकॉर्डवरील अडीचशे गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. ‘वर्तणुकीत बदल झाला पाहिजे. पुन्हा गुन्हेगारीत दिसलात तर याद राखा,’ असा सज्जड दमही अधीक्षक घुगे यांनी गुन्हेगारांना दिला. सराईतांच्या आदान-प्रदान मोहिमेत आक्रमक भूमिका दिसून आली.
दरम्यान, वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील २४४ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती पोलिस मुख्यालयात घेण्यात आली. यावेळी उपाधीक्षक विमला एम., स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते.
जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर अंकुश बसावा, यासाठी पोलिस मुख्यालयात सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. सांगली व मिरज उपविभागातील सर्व पोलिस ठाण्यांचा पोलिस मुख्यालयात; तर तासगाव, इस्लामपूर, विटा आणि जत उपविभागीय कार्यालयात सराईतांची आदानप्रदान मोहीम झाली. प्रत्येक पोलिस ठाण्यातील मागील दहा वर्षांत दोन किंवा त्याहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेले, तसेच अमली पदार्थ कायद्यांतर्गत व शस्त्र अधिनियमांतर्गत दाखल असलेल्या गुन्हेगारांची झडती घेण्यात आली.
यावेळी हजर असलेल्या संशयितांची माहिती घेऊन ते सध्या काय करत आहेत, कोणता व्यवसाय करतात, त्यांच्या उपजीविकेचे साधन काय, त्यांचे मित्र कोण, याची माहिती अद्ययावत करण्यात आली. पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, सध्या जामिनावर बाहेर असलेल्या संशयितांना वारंवार तपासणी करून ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवावे, त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होते की नाही, याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी यावेळी दिल्या.
ज्यांच्यावर दोनहून अधिक गुन्हे आहेत, तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन ‘मोका’अन्वये कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. आजच्या आदान-प्रदानमध्ये सांगली विभागातील ३८, मिरज ४४, इस्लामपूर ४२, तासगाव ३७, विटा ३९ आणि जत ४४ अशा एकूण २४४ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.