Sambhajinagar Orphanage News : विद्यादीप बालगृहाच्या कॉमन बेडरूममध्ये सीसीटीव्ही; बालगृहाच्या भूमिकेवर संतापाची लाट
esakal July 02, 2025 10:45 PM

छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहातून ९ मुली पळून गेल्या. पण त्यात आमचा दोष काय असे म्हणणारे विद्यादिप बालगृह पुन्हा तोंडघशी पडले. मुलींच्या कॉमन बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आदेश खुद्द या बालगृहाच्या अंतर्गत समितीनेच दिले होते.

यामुळे प्रचंड घुसमट सहन न होऊन मुली इथून पळाल्या. तरीही या बालगृहाची बाजू ऐकण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना फोटो काढण्यास मनाई करून बाहेरच थांबवण्यात आले. '' तुम्ही इथे कशाला आले'' म्हणत बालगृहाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

बालहक्कांची पायमल्ली, संताप आणणारी महत्त्वाची बाब या प्रकरणातून समोर आली असून मुलींच्या सुरक्षेच्या नावाखाली मुलींना असे बघणे कितपत योग्य असा प्रश्न निर्माण होतो. कॉमन बेडरूम रूममध्येच सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने आमच्या खासगी आयुष्याचे चित्रीकरण केले जात होते. आम्ही बालगृहात राहतो म्हणून हा प्रकार का, असा आरोप करत छावणीतील विद्यादीप बालगृहातील संतापलेल्या मुलींनी सोमवारी (३० जून) बालगृहाच्या गच्चीवरून लॉक तोडत उड्या मारत पळ काढला.

छावणीपासून नऊ मुली पुढे पळत अन् मागे दामिनी पथक होते. भर रस्त्यावर हा सर्व थरार सुरु होता. मुलींची वाट अडवणाऱ्यांवर मुलींनी दगड, वीट जे दिसेल ते मारायला सुरुवात केली. जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत हा पाठलाग सुरू होता. अखेर कोर्टासमोर दामिनी पथकाने मुलींना पकडले. यातली एका मुलीचा अजूनही शोध लागला नाही. बालकल्याण समितीसमोर मुलींना जेव्हा सादर केले तेव्हा यापैकी काहींनी आमच्या चेजिंग रूममध्येच सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने आमचे सगळे चित्रीकरण सुरू असल्याचा आरोप केला.

काळजी व संरक्षणाच्या मुलींबाबत झालेल्या या घटनेने बालगृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. संताप,संघर्ष, राग, द्वेषाने बाल विकास क्षेत्र हादरले. छावणीतील विद्यादीप बालगृहातील मुलींच्या उद्वेगाचा उच्चांक तेव्हा झाला जेव्हा या मुलींपैकी काही मुलींनी स्वतःच्या हातावरच काचेने घाव करत स्वतःला जखमी केले.

पळून गेलेल्या या मुली

बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) व इतर कारणाने या बालगृहात होत्या.

मात्र या बालगृहात आमच्या छळ तर व्हायचा. आम्हाला जेवण नीट दिले जायचे नाही. एकच साबण महिनाभर पुरवा,असू म्हणत आम्हाला सतत शिवीगाळ व्हायची. तुम्ही अशाच माजलेल्या असता, तुमच्यामुळे बालगृहाचे वातावरण खराब होते. तुमचा बाप काही आम्हाला पैसे देत नाही. तुम्ही कधीच सुधरू शकत नाही.. असे म्हणत आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळायची. आमच्या कॉमन बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावले होते. आमच्या खोलीत कॅमेरे का लावता असे आम्ही नेहमी विचारायचो. आमच्या पालकांना बोलू दिले जात नव्हते. फोन लावून दिला जायचा नाही. म्हणून आम्ही पळालो असे या मुलींनी 'सकाळ'ला सांगितले

'वैयक्तिक काळजी आराखडा नाही

नियमानुसार बालगृहातील प्रत्येक मुलांसाठी वैयक्तिक काळजी आरखडा हवा. याचा फक्त आकडा दिला जातो. पण प्रत्यक्षात कारवाई होत नाही.मुलांची पुनर्वसन पत्रिका तयार होत नाही. बालगृहात समुपदेशक नसतात. मुलांच्या मनाविरुद्ध घटना घडत असल्याने हा संघर्ष उभा राहतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मंगळवारी दिवसभरात काय घडले

झालेल्या प्रकरणाची जिल्हा महिला बालविकास विभागाने दखल घेत मंगळवारी विद्यादीप गाठले. इकडे बालकल्याण समितीनेही प्रकरणाची दखल घेतली आणि पाच सदस्यांनीही बालगृहाची तपासणी केली. यावेळी या आठही मुलींशी संवाद साधण्यात आला.मुलींचे जबाब नोंदवले गेले. मात्र अहवालात नेमके काय दिले याविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही.

अन् तिने ओढणीने गळा आवळला

विद्यादीपमधून पळून गेलेल्या एका मुलीने सोमवारी तिच्या वडिलांनी घरी नेले होते. मंगळवारी सकाळी तिने पुन्हा घरी रहायचे नाही असा तगादा धरला. हातात काचेचा तुकडा घेतल्याने तिच्या वडिलांनी दामिनी पथकाला बोलावून घेतले. या मुलीला ना पालकांकडे रहायचे होते ना विद्यादीपमध्ये यायचे होते. बालकल्याण समिती विद्यादीपमध्ये असल्याने पोलिसांनी तिला पुन्हा विद्यादीपमध्ये आणले तेव्हा तिचा राग अनावर झाला होता. तिने ओढणीने स्वतः गळा आवळून घ्यायचा प्रयत्न केला. नाईलाजाने वडिलांनी तिथून गेले. पण जातानी ते रडत होते.

विद्यादीपमधून पळून गेलेल्या मुली विधी संघर्षग्रस्त नव्हत्या. तर पोक्सो व इतर प्रकारणाने दाखल होत्या. या मुली काळजी व संरक्षणाच्या होत्या. बालकल्याण समितीने मुलींना त्या़च्यासोबत काय झाले ते विचारले. झालेली घटना दुर्दैवी तर आहेच. मुली किती तणावात ह़ोत्या यांचा अंदाज आम्हाला आला. आमचा अहवाल आम्ही वरिष्ठांना देऊ.

अॅड. आशा शेरखाने, अध्यक्ष, बालकल्याण समिती

आम्ही विद्यादीप बालगृहात तपासणी केली. माध्यमातून आलेल्या मुद्दे तपासले. त्यावर बोलणे सुरू आहे. त्यानुसार आम्ही बालगृहाकडून खुलासे मागवले आहे.

रेश्मा चिमंद्रे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी

विद्यापीठ बालगृहातील प्रकारणाने पुन्हा एकदा बालगृहांच्या एसओपीचा विषय पुढे येतो. पोक्सो व इतर प्रकरणाने या बालगृहात आलेल्या या मुलींना इथल्याच सुरक्षेचा त्रास झाला. मुलींना इथे रहायचे नव्हते तर त्यांना का समजून घेण्यात आले नाही. उल्हासनगरमध्ये अशी घटना घडली होती. यानिमित्ताने पोक्स़ो व अशा घटनेने आलेल्या मुलींना ठेवताना, त्यांना सुरक्षा देताना एसओपी का नसावी यांचा महिला बाल विभागाने विचार करावा. या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे विभागाने सांगितले आहे.

डाॅ. नीलम गोऱ्हे, उपसभापती विधान परिषद

विद्यादीप बालगृहातील घडलेली घटना चीड आणणारी आहे. जर बालगृहाचा कोंडवाडा होत असेल, मुलींच्या खोलीत अशाप्रकारे सीसीटीव्ही लावले जात असतील तर ते चुकीचे आहे. आम्ही सरकारला निवेदन दिले आहे. मात्र याला सरकार जबाबदार आहे.

अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.