'सायन्स'चे मेरिट ८३ टक्क्यांवर! अकरावी प्रवेशासाठी नोंदणी ४० हजारांवर अन् प्रवेश फक्त २१५७ विद्यार्थ्यांनाच; कला शाखेकडे पाठ; दुसरी यादी कधी? वाचा...
esakal July 03, 2025 12:45 PM

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होऊन ५ जुलैला दोन महिने होत आहेत, तरीपण विद्यार्थ्यांना अद्याप अकरावीसाठी प्रवेश मिळालेले नाहीत. यंदा प्रथमच प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात असल्याने त्यास विलंब झाला आहे. शुन्य फेरीनंतर आत २८ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे, पण सोलापूर जिल्ह्यातील ५० हजार विद्यार्थ्यांपैकी अवघ्या दोन हजार १५७ विद्यार्थ्यांनाच प्रवेश घेता आला आहे.

राज्यात आतापर्यंत तीन लाख विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील ३९६ कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेत नोंदणी केली आहे. त्यात खासगी अनुदानित, खासगी स्वयंअर्थसहाय्यिता व खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यातील अंदाजे ५० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. पहिल्यांदा शून्य प्रवेश फेरी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून ७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे.

प्रवेश प्रक्रियेत बहुतेक महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या असून उर्वरित प्रवेश जात प्रवर्गनिहाय दिले जात आहेत. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळू शकला नाही, त्यांना ८ जुलैनंतर जाहीर होणाऱ्या दुसऱ्या गुणवत्ता यादीद्वारे प्रवेश मिळेल. तत्पूर्वी, ज्यांना प्रवेश मिळाला नाही, त्या विद्यार्थ्यांना ८ जुलैपासून त्यांचा महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलता येणार आहे.

अकरावी प्रवेशाची स्थिती

  • दहावी उत्तीर्ण विद्यार्थी

  • ५९,२७७

  • प्रवेशासाठी अंदाजे नोंदणी

  • ५०,०००

  • शून्य फेरीतून प्रवेश

  • ९७३

  • पहिल्या फेरीतून प्रवेश

  • १,१९४

  • प्रवेश घेतलेले विद्यार्थी

  • २,१५७

सायन्सचे मेरिट ८३ टक्के; कला शाखेला ४० टक्क्यात प्रवेश

पहिल्या गुणवत्ता यादीनुसार शहरी भागातील नामांकित महाविद्यालयांमधील सायन्स शाखेचे मेरिट ८३ टक्क्यांवर पोचले आहे. दुसरीकडे खेड्यापाड्यातील बहुतेक महाविद्यालयांमध्ये ६७ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळाला आहे. तर ४० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना कला शाखेला प्रवेश मिळत आहे. पहिल्या यादीत वाणिज्य शाखेचे मेरिट देखील कमीच असून बहुतेक महाविद्यालयांमध्ये ६५ ते ७० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू लागला आहे.

दहावीचा निकाल लवकर, पण कॉलेज उशिराच

यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. गतवर्षीपेक्षा यंदा १५ दिवस अगोदर निकाल लागला. मात्र, अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने गतवर्षीच्या तुलनेत महाविद्यालये १५ ते २० दिवस उशिराने सुरू होणार आहेत. जुलैअखेर अकरावीचे वर्ग सुरू होतील, अशी सद्य:स्थिती आहे.

प्रवेशासंदर्भात ठळक बाबी...

  • राज्यातील तीन लाख दोन हजार ६१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अकरावीला प्रवेश घेतला आहे

  • प्रवेश क्षमतेच्या ८० ते ९९ टक्के विद्यार्थी अलॉटमेंट झालेल्या शाखांची संख्या २४८९

  • प्रवेश क्षमतेच्या ६० ते ७९ टक्के विद्यार्थी अलॉटमेंट झालेल्या शाखांची संख्या १८८८

  • प्रवेश क्षमतेच्या ४० ते ५९ टक्के विद्यार्थी अलॉटमेंट झालेल्या शाखांची संख्या ३५०५

  • प्रवेश क्षमतेच्या एक ते ३९ टक्के विद्यार्थी अलॉटमेंट झालेल्या शाखांची संख्या १०,२७८

  • कनिष्ठ महाविद्यालयांच्या नऊ हजार २० शाखांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश अर्ज आले असून उर्वरित दहा हजार ३०४ शाखांसाठी क्षमतेपेक्षा खूपच कमी अर्ज आले आहेत

  • पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांनी ७ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करायचे असून विद्यार्थ्यांना १० जुलै ते १३ जुलैपर्यंत पसंतीक्रम द्यायचे आहेत, त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.