देखणा, डिसेंट पेहराव
esakal July 03, 2025 12:45 PM

पंजाबी ड्रेस किंवा सलवार कुर्ता हा पारंपरिक पंजाबी पोशाख आहे - जो मुख्यतः पंजाब प्रांतात स्त्रिया परिधान करतात; पण हा अतिशय आरामदायी पोशाख असल्यामुळे संपूर्ण भारतात निरनिराळ्या ठिकाणी वापरला जातो. या पोशाखाची मुळे मुघल काळातील आहेत.

हलकेफुलके फॅब्रिक्स, भरघोस विणकाम आणि पारंपरिक फुलकारी (हस्तकला) यामुळे या पोशाखाची ओळख वैशिष्ट्यपूर्ण बनली. आता फुलकारी म्हणजे फुलांनी भरलेली कला हे पंजाबी पोशाखाचे खास वैशिष्ट्य असलेले काम आहे, जे केवळ एक शोभेची गोष्ट नसून भावना आहे.

प्रेम, आशीर्वाद, संस्कार आणि परंपरेचा अद्भुत असा संगम आहे. उत्तर भारतातील काही भागांमध्ये पूर्वीच्या काळी जेव्हा मुलगी लहान असायची, तेव्हा तिच्या आजी, आई, काकू एकत्र येऊन तिच्या हुलकारीचा दुपट्टा मिळायला सुरवात करत असत.

हा दुपट्टा तिला लग्नाच्या दिवशी भेट दिला जाईल अशी भावनांची गुंतागुंत असलेली आपली विविधतेने नटलेली परंपरा कमाल आहे. हा पंजाबी ड्रेस आपल्यासारख्या स्त्रियांसाठी किती सोयीचा आणि सोपा पोशाख आहे! वयात येणाऱ्या मुलींसाठी तर सगळ्यात सुरक्षित असा पेहराव.

मला आठवतं, लहान असताना आईच्या विविध ओढण्या सतत अंगावर घेऊन बघायच्या यामध्ये वेगळाच रुबाब वाटत असे. आता तर ओढणी न घेता वेगवेगळ्या कुर्ती आणि पायजमे यांचे कितीतरी विविध प्रकार बघायला मिळतात. माझी पहिली आवड ही साडी असली, तरीही पंजाबी ड्रेसही तितकाच आवडता पोशाख आहे.

लहानपणी भरतनाट्यमच्या वर्गाला जाताना असे वेगवेगळे पंजाबी ड्रेस घालायची संधी मिळायची. खरंतर शाळेत असेपर्यंत जे आई आणून देईल ते तिच्या आवडीचे कपडे मी घातले. पुढे जसं काम करू लागले तेव्हा मात्र पंजाबी ड्रेसचा ढीग कपाटात असावा असं पाहिलेलं स्वप्न आधी पूर्ण केल्याचं आठवत आहे.

मग वेगवेगळ्या ब्रँडचे पंजाबी ड्रेस, त्यानंतर कुर्ती, पलाजो, लेगिन्स याचा भडिमार होऊ लागला. शूटिंगला जाताना किंवा अगदी प्रवास करतानाही मला सगळ्यात सोयीचा आणि आवडता पेहराव हा पंजाबी ड्रेसच वाटतो. आता मात्र लांबसडक ओढण्या आणि त्यांचे निरनिराळे रंग या गोष्टींचं आकर्षण वाढलं आहे.

माझ्या कपाटात कायम तीन ते चार कप्पे केवळ विविध ओढण्या आणि कुर्ते याने भरलेले असतात. पण शिवून घेतलेले पंजाबी ड्रेस हे मी अगदी क्वचितच घातले आहेत. मनासारखा टेलर मात्र आज सगळ्यात मला मिळालेला नाही याची खंत वाटते. हौसेने आणलेल्या दोन-तीन पंजाबी ड्रेस मटेरिअलची टेलरने वाट लावल्यानंतर मात्र ठरवलं की आता पुन्हा या भानगडीत पडायचं नाही.

तुमच्याकडे मात्र एखादा चांगला टेलर असेल तर मात्र आवर्जून फिटिंगचे शिवून घ्यावेत, कारण असे पंजाबी ड्रेस अप्रतिम दिसतात. खरंतर या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी पेशन्स लागतो, तो देखील माझ्याकडे नाही आणि म्हणूनच रेडीमेड पंजाबी सूट खरेदी करण्यास माझी अधिक पसंती आहे. पण या अप्रतिम पेहरावावर स्टायलिंग उत्तम केलं, तर ते मॉडर्न आणि रेखीवही दिसतं.

हे करून पाहा

  • फॅब्रिक निवडा प्रसंगानुसार - कॉटन, लिनन हे रोजच्या वापरासाठी योग्य आहेत. सिल्क, चंदेरी, जॉर्जेट यांचा वापर सण, समारंभ किंवा पार्टीसाठी करा.

  • फुलकारी किंवा कढाईचा कुर्ता हायलाइट करा - कुर्त्यावर फुलकारी काम असेल, तर सलवार किंवा पलाजो साधा ठेवा. जास्त रंगीत ड्रेसवर मॅचिंगपेक्षा कॉन्ट्रास्ट दुपट्टा वापरा.

  • फ्युजन ट्राय करा - पंजाबी कुर्ता + पलाजो किंवा स्ट्रेट पॅंट्स. कुर्त्याच्या लांबीवर आणि फिटिंगवर लक्ष द्या. शरीरयष्टीनुसार कापड निवडा.

  • ॲक्सेसरीजने पूर्ण लूक तयार करा - झुमके, पंजाबी जोडी, ओढणी/दुपट्टा आणि बिंदी हे लूकला क्लासिक टच देतात. ऑक्सिडाइझ्ड चोकर किंवा बॅंगल्सने ट्रॅडिशनल लूकला मॉडर्न टच द्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.