सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. परंतु याला दिशाच्या वकिलांनी साफ नाकारलं आहे. आमच्याकडे असे काही महत्त्वाचे पुरावे आहेत, ज्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते, असा इशारा दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांनी दिला आहे. लवकरच हे पुरावे आम्ही न्यायालयासमोर सादर करू, असंही ते म्हणाले.
दिशा सालियनची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आला होता. या याचिकेवर पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
“दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा मिळाला आहे. मात्र आमच्याकडे असे काही महत्त्वाचे पुरावे आहेत, ज्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते. याप्रकरणी अनेक साक्षीदारांच्या जिवाला धोका आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं लोकेशन कुठे होतं? त्यांना पत्रकारांना उत्तर देता येत नाही. पण ते न्यायालयावर ढकलत आहेत. न्यायालयातही उत्तर सादर करत नाहीयेत,” असं वकील ओझा म्हणाले.
“तपास अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांनी चुकीचा रिपोर्ट सादर केला आहे. वैद्यकीय रिपोर्ट कोणीही देऊ शकतो. सरकारलादेखील न्यायालयाने वेळ दिला आहे. दिशाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही लवकरच काही महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सादर करणार आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात सतीश सालियन यांनी केलेल्या दाव्यांचं खंडन केलं आहे. प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं हे नमूद केलं आहे. तसंच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सत्य असल्याचं म्हटलं आहे.