धुळे : जिल्ह्याच्या चाळीसगाव (Dhule) तालुक्यातील मोरदड येथील रहिवासी असलेल्या जगदीश ठाकरे या तरुणाचा त्याच्याच गावातील काही तरुणांनी कट रचत गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हत्या करुन सदर संशयित आरोपींनी त्याचा मृतदेह हा चाळीसगाव येथील कन्नड घाटामध्ये फेकून दिला. दरम्यान, या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस (Police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासा दरम्यान तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
धुळे तालुक्यातील मोरदड येथील रहिवासी असलेला जगदीश ठाकरे हा 30 जून रोजी गावातील संशयित आरोपी शुभम सावंत व अशोक सावंत यांच्यासमवेत होता. या दोघांनी जगदीश ठाकरेला घरी जाऊन आपल्याला मित्राच्या वाढदिवसाला जायचं आहे असं सांगून नेले होते. मात्र, त्यानंतर जगदीश ठाकरे घरी परतलाच नाही, त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता कुठेही आढळून न आल्याने कुटुंबीयांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर जगदीश ठाकरे यांच्या मित्रांना माहिती मिळाली की, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एक मृतदेह ताब्यात घेतला असून तो मृत्यू जगदीश ठाकरे याचा आहे की नाही हे पाहावे. त्यामुळे, मित्रांनी पोलीस ठाणे गाठले असता तो मृतदेह जगदीश ठाकरे यांचाच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत, शुभम सावंत, अशोक सावंत आणि विकी राजपूत या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच, या तीनही संशयित आरोपींनी आपण जगदीश ठाकरे यांची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती मृत जगदीश ठाकरे यांच्या नातेवाईकांना दिली. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. जगदीशचा खून नेमकं कशामुळे झाला? यामागील करणाचा पोलीस शोध घेत आहेत.
आणखी वाचा