मोदी असं काय बोलले की घानाचे खासदार झाले अवाक्, म्हणाले भारतात 2500 राजकीय…
GH News July 03, 2025 09:08 PM

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या घाना या देशाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना घानाच्या संसदेला संबोधित करण्याचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश आणि भारतातील लोकशाही यांची माहिती दिली. तसेच भारत आणि घाना या दोन्ही देशांतील संबंध सलोख्याचे आहेत, ते यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे भारतातील लोकशाहीबद्दल सांगताना मोदी यांनी आमच्या देशात 2500 पेक्षा जास्त राजकीय पक्ष आहेत, असे सांगितले. हे ऐकताच घानाच्या संसदेत बसलेले लोकप्रतिनीधी चांगलेच अवाक झाले. आश्चर्याने ते एकमेकांकडे पाहात होते.

मोदींनी केले घाना देशाचे कौतुक

गेल्या तीन दशकांत नरेंद्र मोदी हे घाना या देशाला भेट देणारे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. गुरुवारी मोदी यांनी घानाच्या संसदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी घाना या देशाचे कौतुक केले. तुमच्याकडे प्रसिद्ध असलेल्या अननसापेक्षाही भारत आणि घाना या दोन्ही देशांची मैत्री जगात प्रसिद्ध आहे, असे उद्गार यावेळी मोदी यांनी काढले.

140 कोटी भारतीयांतर्फे आभार मानतो

तसेच, घाना या देशात येणे माझे सौभाग्य आहे. हा देश लोकसभेच्या भावनेने ओतप्रोत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा प्रतिनिधी म्हणून मी घाना या देशासाठी सद्भावना आणि शुभेच्छा घेऊन आलो आहे. मला घानामध्ये मिळालेल्या सर्वोच्च सन्मानाबद्दल मी 140 कोटी भारतीयांतर्फे आभार मानतो, असेही यावेळी मोदी म्हणाले. तसेच घाना हा देश साहसाने उभा आहे. हा देश संपूर्ण आफ्रिका महाद्विपासाठी प्रेरणा आहे, असे गौरवोद्गारही मोदी यांनी काढले.

भारतात 2500 पेक्षा जास्त राजकीय पक्ष आहेत

पुढे बोलताना त्यांनी भारतातील लोकशाहीचा उल्लेख केला. भारत हा लोकशाहीची जननी आहे. आमच्यासाठी लोकशाही फक्त एक व्यवस्था नाही. तर लोकशाही आमच्या मूल्यांचा एक भाग आहे. भारतात 2500 पेक्षा जास्त राजकीय पक्ष आहेत, असे मोदी यांनी सांगितले. ही माहिती ऐकताच घानातील लोकप्रतिनिधींनी एकमेकांकडे पाहात आश्चर्य व्यक्त केले. तसेच आमच्या देशात वेगवेगळे 20 पक्ष सत्तेत आहेत. आमच्या देशात 22 अधिकृत भाषा आहेत. हजारो बोलीभाषा आहेत. त्यामुळेच भारत देश येणाऱ्या लोकांचे खुल्या मनाने स्वागत करतो, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, घाना देशात पोहोचल्यानंतर मोदी यांचे पारंपरिक शैलीत स्वागत करण्यात आले. अकरा येथील हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर घाना देशातील मूळच्या भारतीय समूदायाने मोदी यांचे जोरदार स्वागत केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.