चीन पेंटागॉनपेक्षा दहापट मोठी ‘मिलिटरी सिटी’ उभारतोय, अणुहल्ल्याचा काहीच परिणाम होणार नाही
GH News July 03, 2025 11:07 PM

पेंटागॉनच्या दहापट मोठ्या आकाराचा मोठी नवी लष्करी सिटी चीन गुपचूप बांधत आहे. तज्ज्ञ याचा संबंध चीनच्या तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीशी जोडत आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, ‘बीजिंग मिलिटरी सिटी’मध्ये तयार करण्यात आलेले बंकर अणुहल्ल्याला तोंड देण्यास सक्षम आहे.

हे बंकर युद्धादरम्यान कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणूनही काम करू शकतात. पेंटागॉन ही जगातील सर्वात मोठी अधिकृत इमारत आहे, जी अमेरिकेच्या संरक्षण खात्याद्वारे चालविली जाते. पण, चीनच्या नव्या लष्करी शहरासमोर हे काहीच नाही.

चीनपासून 20 मैल अंतरावर उभारण्यात येणार लष्करी शहर

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी बीजिंगच्या नैर्ऋत्येला सुमारे 20 मैलांवर असलेल्या एका विशाल क्षेत्रात चीनचे लष्करी शहर उभारण्यात येत आहे. या परिसरात चिनी सैन्याची उपस्थिती नसली तरी चीनच्या भविष्यातील लष्करी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे, असे अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचे मत आहे. शी जिनपिंग चीनची अण्वस्त्रे झपाट्याने वाढवत आहेत, जे दशकभरात अमेरिकेच्या अण्वस्त्रांना टक्कर देऊ शकतात.

आण्विक हल्ल्यांपासून सुरक्षित राहणार ‘हे’ शहर

कोणत्याही देशाकडे अण्वस्त्रे असणे पुरेसे नाही, तर शत्रूच्या अण्वस्त्रांपासून अधिक भक्कम संरक्षणाचीही गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या लष्करी शहराखाली चीन बंकर बांधत असल्याचे मानले जात आहे. या संकुलाच्या बांधकामाचे वृत्त सर्वप्रथम फायनान्शिअल टाईम्सने दिले होते, ज्यात सॅटेलाईट इमेजमधून त्याचे बांधकाम दाखवण्यात आले होते.

मिलिटरी सिटीचे बांधकाम 2024 मध्ये सुरू होणार

फेब्रुवारी 2022 मध्ये, ही जागा चोनकिंग जलाशयाच्या उत्तरेकडील भागात निवासी इमारती आणि मोकळ्या जमिनीच्या स्वरूपात होती. वर्षभरानंतर मोठ्या बांधकाम प्रकल्पाच्या तयारीसाठी मोठय़ा प्रमाणात मंजुरी देण्यात आली. त्याचे बांधकाम 2024 च्या मध्यात सुरू झाले. सर्वप्रथम आजूबाजूच्या बोगद्यांचे आणि रस्त्यांचे जाळे टाकण्यात आले. त्यानंतर बंकर बांधण्यात आले आणि आता वर इमारतीचे काम केले जात आहे. मात्र, चीन सरकारच्या म्हणण्यानुसार अशी कोणतीही सुविधा अस्तित्वात नाही. या बांधकाम प्रकल्पाचा अधिकृत उल्लेख नाही आणि चिनी दूतावासाचा दावा आहे की त्यांना याबद्दल कोणतीही माहिती नाही.

चीनने ‘ही’ जागा गुप्त ठेवली

चीनने या भागाच्या संरक्षणासाठी वॉटरप्रूफ सीमाभिंत बांधली आहे. येथे बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. इतकंच नाही तर बांधकामाच्या ठिकाणी ड्रोन आणि कॅमेऱ्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या एका माजी वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने ‘FT’ ला सांगितले की, नवीन कमांड सेंटर शीतयुद्धाच्या काळातील चीनच्या विद्यमान लष्करी मुख्यालयाची जागा घेऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, “नवीन सुविधेचा आकार, प्रमाण आणि अंशतः दबलेली वैशिष्ट्ये सूचित करतात की हे वेस्टर्न हिल्स कॉम्प्लेक्सची जागा प्राथमिक युद्धकालीन कमांड सुविधा म्हणून घेईल.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.