संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन खात्याची १९.४३ हेक्टर जागा पालिकेच्या ताव्यात
esakal July 04, 2025 01:45 AM

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन खात्याची १९.४३ हेक्टर जागा पालिकेच्या ताव्यात
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्यासाठी वापरणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्यासाठी आवश्यक असलेली १९.४३ हेक्टर वनजमीन मुंबई महापालिकेकडे वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्यता मिळाली असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिली.
हा प्रकल्प केवळ वाहतुकीसाठीच नव्हे, तर महानगराच्या समतोल विकासासाठीही एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हा प्रकल्प मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा नवीन प्रमुख जोडरस्ता आहे. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस मोठा फायदा होणार आहे. वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत या नवीन जोडरस्त्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होणार आहे.
इंधन वापरात बचत, मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे. प्रकल्पाच्या टप्पा ३ (अ) अंतर्गत उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम, तर टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किलोमीटर लांबीचा तिहेरी मार्गिका असलेला पेटी बोगदा तसेच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर असल्याची माहिती बांगर यांनी दिली.

जमिनीखाली १६० मीटर खोल बोगदा
जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात आहे. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुवीजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश आहे. पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची तजवीजदेखील बोगद्याखाली करण्यात आली आहे.

बाधित झाडांचे होणार पुनर्रोपण
प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील कोणतीही झाडे, जमीन थेट बाधित होणार नाही. तसेच राज्य शासनाने सुचविलेल्या सर्व पर्यावरणीय उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. वन (संरक्षण व संवर्धन) नियम, २०२३ नुसार पर्यायी वनीकरण योजना तयार करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वसनविहीरा गावात १४.९५ हेक्टर आणि गोंडमोहाडी गावामध्ये ४.५५ हेक्टर अशा एकूण मिळून १९.५ हेक्टर वनेतर क्षेत्रात वृक्षारोपण व देखभाल केली जाणार असल्याची माहितीदेखील अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.