सामूहिकपणे शेती काळाची गरज
डॉ. जीवन आरेकर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
रोहा, ता. ३ (बातमीदार)ः बदलत्या काळात केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी सामूहिक शेती आणि पूरक (दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, प्रक्रिया उद्योग इ.) व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. कृषी विभाग विविध शेतीसंबंधी संस्थांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण आणि सेंद्रिय शेतीवर भरे देणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन वनस्पतीतज्ज्ञ डॉ. जीवन आरेकर यांनी केले.
रोह्यात कृषिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवर आणि शेतीमध्ये विशेष कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी महादेव करे, व्हीआरटीचे सुशील रुळेकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश वारगे, प्रास्ताविकात पंचायत समितीचे कृषी रणजित लवाटे यांनी हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या कृषी योगदान व राज्याच्या प्रगतिशील कार्याचा यथोचित आढावा घेतला. पंचायत समिती कृषी योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या ठिकाणी गारभट गावच्या संगीता पवार, बाहे गावचे खेळु थिटे, बोरघरचे मेघेश भगत, नडवलीचे चंद्रकांत जाधव, निवीचे राजेंद्र जाधव यांना शेतीमध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले. काही शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीद्वारे मिळालेल्या यशोगाथा मांडल्या.
----------------
सांगडे गावात यांत्रिक पद्धतीने भातलागवडीचे प्रात्यक्षिक
रोहा, ता. ३ (बातमीदार) ः तालुक्यातील सांगडे या गावी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भातलागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. रायगड जिल्ह्यासह कोकणात अजूनही पारंपरिक पद्धतीने भातलागवड केली जाते, परंतु वाढती महागाई व शेती क्षेत्राशी संबंधित घटकांचेही दर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेती परवडत नसल्याची शेतकरीवर्गाची तक्रार आहे, मात्र सांगडे गावातील कृषिनिष्ठ शेतकरी केशव खरिवले यांनी, शेतीकडे उपजीविकेच्या साधनाबरोबरच व्यावसायिक दृष्टीने पाहिले असता फायदेशीर ठरू शकते. बहुपर्यायी शेतीचा मार्ग पत्करून चांगले उत्पादन घेता येते. पावसाळी हंगामात भातलागवडीच्या कामात यांत्रिक पद्धतीचा वापर करून कमी वेळेत जास्त कामाबरोबरच अधिक आर्थिक फायदा होऊ शकतो, असे खरिवले यांनी सांगितले. या वेळी भातलागवडीप्रसंगी कृषी पर्यवेक्षक कविता दोरगुडे व कृषी सहाय्यक मंगेश भिंगार्डे यांनी यांत्रिक पद्धतीच्या भातलागवडीचे प्रात्यक्षिक पाहिले.
रोहा ः सांगडे येथे यांत्रिक पद्धतीने भातलागवडीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
...........
पेणच्या वन विभागामार्फत वृक्षारोपण
पेण (वार्ताहर) : ‘माझे वन’ या उपक्रमात पेण वन विभाग कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील उंबर्डे येथील माळरानावर वृक्षारोपण करण्यात आले. तालुक्याच्या उंबर्डे सर्व्हे नंबर ५० मध्ये माळरानांवर वन परिक्षेत्र अधिकारी सपना सोनार यांच्या उपस्थितीत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वन विभागाचे अधिकारी भाऊसाहेब आडे, नितीन राऊत आदी उपस्थित होते.