दूर दूरना भूतकाळमां हूं… थेट त्रिनिदाद- टोबॅगोच्या पंतप्रधानांनी वाचली मोदींची कविता; कशाबद्दल मानले धन्यवाद?
GH News July 04, 2025 02:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुत्सद्दी राजकारणी असले तरी ते कवीही आहेत. मोदी गुजराती भाषेत कविता लिहितात. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्धही आहेत. हे अनेकांना माहीत नसेल. मोदी सध्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना त्यांच्याच कविता ऐकण्याचा अनुभव आला. खुद्द त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी मोदींची कविता त्यांना ऐकवली. कमला प्रसाद बिसेसर एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी मोदींचं भरभरून कौतुक केलं. तसेच भारताकडून कोव्हिड व्हॅक्सिन दिल्याबद्दल मोदींचे आभारही मानले.

आम्ही अशा व्यक्तीचा गौरव करत आहोत की, जो आमच्या अत्यंत जवळ आहे. जो आम्हाला अत्यंत प्रिय आहे. ज्यांचा दौरा केवळ एक प्रोटोकॉलचा भाग नसून आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, अशा नेत्याचा आम्ही गौरव करत आहोत. ही आमच्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे. असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी म्हटलंय.

जगातील सर्वात सन्मानित, सर्वात प्रशंसनीय आणि दूरदर्शी नेत्यांपैकी एक, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना मला अभिमान वाटत आहे. पंतप्रधान महोदय, तुम्ही एक परिवर्तनकारी शक्ती आहात. तुम्ही देशाला एक प्रमुख आणि वैश्विक शक्तीच्या रुपाने स्थापित केलं आहे, असं कमला म्हणाल्या.

दूरदर्शी… भविष्योन्मुखी…

तुम्ही दूरदर्शी आणि भविष्योन्मुखी योजनांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण केलं आहे. एक अब्जाहून अधिक लोकांना सशक्त केलं आहे. आणि त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगभरात राहत असलेल्या भारतीयांच्या मनात तुम्ही अभिमानाची भावना निर्माण केली आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

तुमचा प्रभाव…

यावेळी कमला प्रसाद बिसेसर यांनी मोदींच्या जुन्या दौऱ्याचा उल्लेख केला. 2002मध्ये तुम्ही आमच्या देशाचा पहिला दौरा केला होता. तेव्हा तुम्ही पंतप्रधान नव्हता. तर सांस्कृतिक राजदूत होता. आज तुम्ही 1.4 बिलियनहून अधिक लोकांच्या सरकारचे प्रमुख म्हणून आला आहात. पीएम मोदी एक लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा प्रभाव सीमेच्याही पलिकडे आहे, असंही त्या म्हणाल्या.

मोदींच्या कवितेचा उल्लेख

यावेळी कमला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक गुजराती कविता वाचून दाखवली. यात्रा नावाची ही कविता आहे. दूर दूर ना भूतकाळमां हूं जई शकू छू… एक एक एक चेहरा स्पष्टपणे ओळखी शकू छू… अशा या कवितेच्या ओळी आहेत. याचा अर्थ दूर दूरच्या भूतकाळात आपण जाऊ शकतो आमि एक एक एक चेहरा आपण स्पष्टपणे ओळखू शकतो… असा आहे. कमला यांनी ही कविता वाचताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

म्हणून सर्वोच्च सन्मान दिला

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला यांनी कोव्हिड व्हॅक्सिन दिल्याबद्दल भारताचे आभार मानले. भारत जगाला हात देत आहे. चार वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला व्हॅक्सिन दिलीच. पण तुम्ही छोट्या छोट्या देशांनाही व्हॅक्सिन कशी मिळेल याकडे लक्ष दिलं. ज्या ज्या ठिकाणी भीतीचं वातावरण होतं, दहशतीचं वातावरण होतं, तिथे तुम्ही शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच आम्ही तुम्हाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वाच्च सन्मान दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.