Stock Split : संरक्षण कंपनीचा शेअर दोन भागात विभागला, शेअर्सला लागले अप्पर सर्किट
मुंबई : संरक्षण क्षेत्रातील कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज ४ जुलै रोजी मोठी वाढ झाली. शेअर्स १०% वाढून अप्पर सर्किटला पोहोचला. आजपासून शेअर विभाजन म्हणजेच स्टाॅक स्प्लिट लागू झाल्यानंतर Paras Defense and Space Technologies च्या शेअर्सने ही उसळी घेतली आहे. शेअर्सचे विभाजन १:२ च्या प्रमाणात झाले आहे. म्हणजेच कंपनीचा प्रत्येक शेअर दोन भागात विभागला गेला. या शेअर विभाजनानंतर आज ४ जुलैपासून नवीन शेअर किंमत समायोजित करण्यात आली आहे.
पहिले स्टॉक स्प्लिट
Paras Defense and Space Technologies ने ३० एप्रिल २०२५ रोजी शेअर बाजाराला सांगितले की, १० रुपये दर्शनी मूल्य असलेले प्रत्येक शेअर्स ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दोन शेअर्समध्ये विभाजित केले जातील. पारस डिफेन्सच्या शेअर्सचे हे पहिले स्टॉक स्प्लिट आहे.
रेकॉर्ड तारीख
या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख ४ जुलै निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच, गुरुवार ३ जुलै रोजी बंद होईपर्यंत पारस डिफेन्सचे शेअर्स असलेले गुंतवणूकदार या स्टॉक स्प्लिटसाठी पात्र असतील. आज म्हणजेच शुक्रवारी शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार या फायद्यासाठी पात्र राहणार नाहीत.
कंपन्या स्टॉक स्प्लिट का करतात?
कंपन्या सहसा त्यांच्या शेअर्सची संख्या वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना ते अधिक परवडणारे बनवण्यासाठी स्टॉक स्प्लिटचा अवलंब करतात. यामुळे शेअर्समध्ये तरलता वाढते आणि व्यवहार सोपे होतात.
शेअर्सचा परतावा
सकाळी ११.३० च्या सुमारास पारस डिफेन्सचे शेअर्स त्यांच्या अप्पर सर्किट लिमिटमध्ये ९३३.५ रुपयांवर लॉक झाले. बीएसईवर शेअर्स १० टक्क्यांनी वाढले. गेल्या ६ महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना ८५% परतावा दिला आहे.