महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आणि त्यापैकी एक आदर्श स्त्रीसंत म्हणजे संत सखुबाई. ज्यांनी विठुरायाच्या भक्तीत आपले जीवन वाहिले. भक्ती म्हणजे केवळ देवाचं नाव घेणं नव्हे तर त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक आहे हे त्यांनी सिद्ध केले. अशा विठुरायाच्या निस्सीम भक्त संत सखूबाईंविषयी आज जाणून घेऊया. (saint sakhubai a great devotee of lord vitthal)
सखूबाईंना बालपणापासूनच भगवंताविषयी अपार प्रेम होते. पण त्यांचा विवाह एका अशा कुटुंबात झाला ज्यांचे विचार त्यांच्यापेक्षा फार वेगळे होते. सखुबाई जेवढ्या मृदू, नम्र त्यांचे सासू-सासरे आणि पती तितकेच दुष्ट, कुटिल आणि कठोर होते. सखूबाईंना त्रास देण्याची ते एकही संधी सोडत नव्हते. दिवसभर यंत्रासारखे काम करूनही त्यांना पोटभर अन्न देत नव्हते. पण हीच देवाची दया मानून सखुबाई सगळं सहन करत होत्या.
एकेदिवशी नदीवर पाणी भरताना सखूबाईंचे लक्ष विठूनामाचा गजर करत निघालेल्या वारकऱ्यांकडे गेला. त्यांना पाहून सखूबाईंच्या मनात विठुरायाच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. घरातून परवानगी मिळणार नाही, हे त्यांना ठाऊक होतं. पण विठूभेटीची इच्छा त्यांना थेट वारकर्यांच्या समूहात घेऊन गेली. त्यांच्या एका शेजाऱ्याने हे दृश्य पाहिले आणि त्यांच्या सासूबाईंना जाऊन सांगितले. हे ऐकताच सासूबाईंनी लेकाचे कान भरले आणि सुनेला ओढून आणण्यास धाडले. अक्षरशः मारहाण करत त्यांना घरी आणण्यात आले. त्यानंतर शिक्षा म्हणून बांधून ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर खाणेपिणेही बंद केले.
घट्ट दोरीमुळे सखूबाईंच्या अंगावर अक्षरशः खड्डे पडले. त्यावेळी सखूबाईंनी थरथरत्या स्वरात देवाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली आणि त्याक्षणी प्राण सोडेन असे म्हटले. भक्ताच्या अंतरात्म्याचा आवाज भगवंतापर्यंत पोहोचला आणि वैकुंठनाथाचे आसन हलले. देवाने सखूबाईंच्या पतीचा वेश घेतला आणि त्यांची भेट घेतली. दोरी सोडत तिला पंढरपूरला जाण्याची परवानगी दिली. सखुबाई आनंदाने पंढरपुराकडे मार्गस्थ झाल्या आणि इकडे भगवंताने सखूबाईंची जागा घेतली.
सखूबाईंनी विठुरायाचे डोळे भरून दर्शन घेतले आणि शरीरात प्राण असेपर्यंत आपण पंढरपूराबाहेर जाणार नाही, अशी शपथ घेतली. पांडुरंगाच्या ध्यानात त्यांनी समाधी घेतली आणि अखेर जीव सुटला. त्यांचा देह पडला. त्यांच्या गावाजवळील एका ब्राम्हणाने त्यांना ओळखले आणि अन्य भाविकांच्या मदतीचे त्यांचे अंत्यसंस्कार केले.
सखूबाईंच्या समाधी जाण्याने रुक्मिणी देवीची चिंता वाढली. सखुबाई घरी गेल्याच नाही तर भगवंत परतणार कसे? म्हणून सखूबाईंची भक्ती आणि समर्पण पाहून रुक्मिणी देवीने त्यांना नव्या देहात जीवदान दिले. नव्या जन्मानंतर भगवंत आपल्या रूपात आपल्या कुटुंबाची सेवा करत असल्याचे पाहून सखुबाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. दुसरीकडे भगवंताच्या सानिध्यात राहून सखूबाईंचे कुटुंब सात्विक झाले होते. सखुबाई घरी परतल्या आणि त्यांच्या मागोमाग त्यांच्या मृत्यूची बातमीदेखील आली. सखूबाईंनी सगळ्यांना भगवंताची लीला सांगितली. सर्व ऐकल्यानंतर त्यांचे सासू- सासरे आणि नवऱ्याचे अंत:करण निर्मळ झाले. त्यांची भक्ती आणि भगवंताच्या कृपेपुढे सारे नतमस्तक झाले. गावोगावी त्यांच्या भक्तीची कथा सांगितली जाऊ लागली आणि सगळे त्यांना ‘संत सखुबाई’ म्हणून ओळखू लागले.
हेही पाहा –