पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान तणावाची परिस्थिती असतानाही हॉकी आशिया चषक व ज्युनियर वर्ल्ड कपसाठी यजमान हिंदुस्थानने पाकिस्तानी संघाला दौऱयासाठी ग्रीन सिग्नल दिलाय. आम्ही फक्त द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानविरुद्ध खेळत नाही. मात्र, हिंदुस्थानात होणाऱया आंतरराष्ट्रीय स्पर्धांना आम्ही कुठल्याही संघांना हिंदुस्थानात येण्यासाठी अडविणार नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानी संघाने चलो बिहारचा नारा बुलंद केला आहे.
मंत्रालयातील अधिकाऱयांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अनेक संघ तणावाच्या परिस्थितीतही सहभागी होत असतात. रशिया व युव्रेन हे देश युद्ध सुरू असतानादेखील स्पर्धेत सहभागी होत आहेत. बिहारमधील राजगिरमध्ये 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान हॉकी आशिया चषक रंगणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला ग्रीन सिग्नल मिळाला असला तरी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ‘बीसीसीआय’ने अद्याप सरकारशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे याबाबतची स्पष्टता चर्चेनंतर हाईल, असेही त्यांनी सांगितले.
हॉकी इंडियाचे सह सचिव भोलानाथ सिंह म्हणाले, ‘पाकिस्तानी हॉकी संघ हॉकी आशिया चषक स्पर्धेसाठी हिंदुस्थानात येईल की नाही हे आताच सांगता येणार नाही. पहलगाममधील अतिरेकी हल्ला व त्यानंतरचे हिंदुस्थानचे ऑपरेशन सिंदूर पार्श्वभूमीवर पाकिस्तानी हॉकी संघाच्या हिंदुस्थान दौऱयाबाबत आताच काही बोलता येणार नाही.
पाकिस्तानी संघ 2016मध्ये हिंदुस्थानात आला नव्हता
पठाणकोट एअरबेसवर 2016मध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे हिंदुस्थानात झालेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाने सहभाग घेण्यास नकार दिला होता. म्हणून त्यावेळी पाकिस्तानाऐवजी मलेशियाला या स्पर्धेत संधी देण्यात आली होती. आता हिंदुस्थानात या वर्षी 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत चेन्नई व मदुराई येथे ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप होणार आहे. मात्र, या स्पर्धेत सहभागी होणाऱया कुठल्याही देशाला आम्ही अडवणार नाही, असे सरकारने स्पष्ट केल्याने आता पाकिस्तानी संघ या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबतची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.