पुण्यात एका कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या समक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला आहे. राज्यात हिंदी सक्तीविरोधात वातावरण तापले असताना आणि उद्या हिंदी सक्तीचा जीआर सरकारने मागे घेतल्याने वरळीत राज आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा होत असतानाच शिंदे यांनी डीवचणारे वक्तव्य केल्याने आता राज्यभर नवा वाद तयार झाला आहे. विरोधकांनी शिंदे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटल्याने यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला हाणला आहे. ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांचे आश्चर्य वाटते की पुण्यासारख्या शहरात असे बोलणे, कुठल्या दिशेला चाललो आपण.आता शिंदे साहेब भेटल्यावर काय म्हणावं की केम छो शिंदे साहब. अमित शाह खुश होतील की माहीती नाही, पण शिंदे यांच्यामुळे मराठी माणूस नाराज होईल हे नक्की.
मराठी माणसाच्या डोक्यातील हवा गरम असताना त्यांनी असं केलंय असेही आव्हाड आपली प्रतिक्रीया देताना म्हणाले. विनाशकाले विपरीत बुद्धी.. ही एकनाथ शिंदे यांची झाली आहे, त्यामुळे त्यांनी “जय गुजरात” अशी घोषणा केली आहे. कोणाला तरी खुश करण्याकरिता ते असे बोलले असतील असाही टोला त्यांनी लगावला आहे.
सोमनाथ सुर्यवंशी याची हत्याच झाले हे पहिल्या दिवसापासून बोलत आहे. त्यामुळे सभागृहात मुख्यमंत्र्यांनी खोटी माहीती दिली होती. आणि कोर्टाने देखील आता पोलीसांवर या प्रकरणात गुन्हे दाखल करायला सांगितले आहे.त्यामुळे गुन्हे दाखल झालेच पाहीजेत असेही ते म्हणाले.
या सरकारच्या मनातला वास्तविकपणा महाराष्ट्राच्या समोर आला आहे. मातृभाषेवरचं सरकारचं मत स्पष्ट झालं. हे सगळे गुजराती वॉशिंगमशिनमध्ये साफ झालेले आहेत. ह्यांची वास्तविकता स्षष्ट झाली आहे अशा हल्लाबोल काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर या पध्दतीने जय गुजरात म्हणण्याचा मी निषेध करतो असेही ते म्हणाले.
नाना पटोले पुढे म्हणाले की त्यांना जय भारत बोलावं लागेलं. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, मी त्यांचा निषेध करतो. महाराष्ट्राला कलंकीत करण्याचा अधिकार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री दबावात राहून असं बोलतात त्याचा निषेध करतो.
एकीकडे मराठीचा अपमान दुसरीकडे कुणाच्या तरी दबावात येऊन असं वक्तव्यं करणं योग्य नाही. त्या-त्या राज्याला स्वत:चा गौरव करावा लागतो. मात्र महाराष्ट्राच्या भूमीवर ‘जय गुजरात’ म्हणणे महाराष्ट्राला कलंकीत करणं आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी, इथं आल्यानंतर, अमित शाह, पंतप्रधान यांनी जय महाराष्ट्र बोललं पाहिजे असेही ते म्हणाले.
ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रात मराठी मातीत पोसला गेला आहे, मराठी माणसांनी भरभरून प्रेम दिलं त्यांच्याशी सगळ्या प्रतारणा करत एकनाथ शिंदे ‘जय गुजरात’ म्हणाले. एकनाथ शिंदेंकडे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता हा गुण नसला तरी त्यांच्याकडे ‘धूर्तपणा’ हा आहे अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
अमित शहांची भाटगिरी*** केली पाहिजे, हा सेन्स तर त्यांना नक्कीच आहे. उद्या सगळा महाराष्ट्र एकवटत आहे. ज्या मराठी मातीने यांचा देह पोसलाय, त्यांना मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही..मराठी माणसांची प्रतारणा करत एकनाथ शिंदे ‘जय गुजरात’ म्हणतात.एकनाथ शिंदे यांच्या ठायी धूर्तपणा ठासून भरलेला आहे. अजित पवारांनी आपल्यावर सरशी केलीय, देवेंद्र फडणवीस आपल्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.अशावेळी आपण भाटगिरी केली पाहिजे एवढा सेन्स एकनाथ शिंदे यांच्याकडे नक्कीच आहे..मीच तुमचा सर्वात जास्त वफादार आहे, हे सांगण्याची संधी एकनाथ शिंदे कशी सोडतील? जे मराठी माणसाला धोका देऊ शकतात, ते उद्या गुजरातशी तरी कसे प्रामाणिक राहतील. उद्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या छाताडावर बसून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात, याची कल्पना फडणवीस यांना सुद्धा असेल असेही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.
एकनाथ शिंदे हे गुजरात सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले होते. म्हणून ‘जय गुजरात’ म्हणून ते लांगूनचालन करत होते असा तिरकस टोला शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. व्यापारी विजय केडिया याने मराठीद्रोही वक्तव्य केले आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की ते महाराष्ट्रद्रोही आहेत, सरकारने काहीतरी कृती केली पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे असेही ते म्हणाले.