इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने या दुसऱ्या कसोटीवर भक्कम पकड मिळवली आहे. भारतीय संघाने खेळ संपेपर्यंत 244 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. भारताच्या हातात दुसऱ्या डावात 9 विकेट्स आहेत. भारतीय संघाने शुबमन गिल याच्या द्विशतकाच्या जोरावर 587 धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद सिराज याने 6 आणि आकाश दीप याने 4 विकेट्स घेत इंग्लंडला पहिल्या डावात 407 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह 180 धावांची मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून 64 धावा केल्या आहेत. केएल राहुल आणि करुन नायर ही जोडी नाबाद परतली आहे. केएल 28 तर करुन 7 धावांवर नाबाद आहेत. तर यशस्वीच्या रुपात भारताने एकमेव विकेट गमावली. यशस्वीने 22 बॉलमध्ये 6 फोरसह 28 रन्स केल्या. इंग्लंडच्या जोश टंग याने यशस्वीला आऊट केलं.
इंग्लंडची 84 धावांवर 5 अशी स्थिती झाली होती. त्यानतंर जेमी स्मिथ याने नाबाद 184 आणि बॅरी ब्रूक याने 158 धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 303 रन्सची पार्टनरशीप केली. या दोघांच्या भागीदारीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांपर्यंत पोहचता आलं. त्यानंतर भारतीय संघाने नव्या चेंडूच्या मदतीने इंग्लंडला 20 धावांच्या मोबदल्यात 5 झटके देत ऑलआऊट केलं. इंग्लंडच्या 6 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. टीम इंडियासाठी मोहम्मद सिराज याने 70 रन्स देत सर्वाधिक 6 विकेट्स मिळवल्या. तर आकश दीप याने 88 धावांच्या मोबदल्यात चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.