टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडसाठी जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक या जोडीने प्रत्येकी दीडशतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला 400 पार मजल मारता आली. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 407 धावा केल्या. भारताला अशाप्रकारे 180 धावांची आघाडी मिळाली. भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून 64 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 244 धावांची आघाडी मिळवली.
केएल राहुल 28 आणि करुण नायर 7 धावा करुन नाबाद परतले. तर यशस्वी जैस्वाल याच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. यशस्वीच्या विकेटवरुन मैदानात मोठा राडा पाहायला मिळाला. यशस्वीच्या विकेटवरुन इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने पंचांसह हुज्जत घातली.
नक्की काय झालं?जोश टंग याने यशस्वीला दुसऱ्या डावातील 8 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. जोशने टाकलेला बॉल यशस्वीच्या पॅडवर लागला. इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली. पंचानेही वेळ न घेता यशस्वीला एलबीडब्ल्यू घोषित केलं. यशस्वीला हा निर्णय पटला नाही. यशस्वीने नॉन स्ट्राईकवर असलेल्या केएल राहुलसोबत चर्चा केली. यशस्वीने शेवटच्या सेंकदाला डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र यशस्वीने 15 सेकदांची वेळ संपल्यानंतर रिव्हीव्यूचा निर्णय घेतल्याचा दावा करत बेन स्टोक्स अंपायरसह वाद घालायला लागला. नियमानुसार, रिव्हीव्यू घेण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी दिला जातो. मात्र स्टोक्सनुसार, यशस्वीने 15 सेकंदानंतर रिव्हीव्यू घेण्याबाबत हाताने इशारा केला. स्टोक्सने यशस्वीच्या रिव्हीव्यूवर आक्षेप घेतला आणि पंचासह बोलू लागला. स्टोक्सला राग अनावर झाला.
संतापलेल्या बेन स्टोक्सला मैदानातील दोन्ही पंचांनी समजावून सांगितलं. पंचांनी यशस्वीची डीआरएसची मागणी मान्य केली. त्यामुळे यशस्वी आऊट की नॉट आऊट? याचा अंतिम फैसला हा थर्ड अंपायर जाहीर करणार होते. सर्वांचं लक्ष आता मोठ्या स्क्रीनवर होतं. यशस्वीला रीव्हीव्यू घेण्याचा काही फायदा झाला नाही. थर्ड अंपायरने फिल्ड अंपायरच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आणि यशस्वी आऊट असल्याचं जाहीर केलं.
यशस्वी आऊट झाल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. मात्र स्टोक्सने अंपायरसोबत केलेलं वर्तन साऱ्या क्रिकेट विश्वाने पाहिलं. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यशस्वीच्या रीव्हीव्यूवरुन बेन स्टोक्सचा पंचांसह वाद
pic.twitter.com/N4tnt7IwRz
— BavumaTheKing Temba (@bavumathek83578)
दरम्यान यशस्वीने दुसऱ्या डावात 22 चेंडूच्या मदतीने 28 धावा केल्या. यशस्वीने या खेळीत 6 चौकार लगावले. अर्थात यशस्वीने चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. तर एकूण खेळीतील 4 धावा या धावून घेतल्या. तर यशस्वीने पहिल्या डावात 87 धावा केल्या होत्या.