नवी दिल्ली / भुवनेश्वर : भारताने इंग्रजी भाषेला अनेक शब्द दिले आहेत. मात्र, कदाचित कोणताही शब्द ‘जगन्नाथ’इतका प्रभावी नाही. भगवान जगन्नाथापासून घेतलेल्या या शब्दाला कैक शतकांचा इतिहास आहे; तसेच तो वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या संदर्भांमध्ये वापरला आहे.
जगन्नाथ शब्द एखाद्या विशाल व प्रचंड शक्ती किंवा वस्तूला सूचित करतो. हा शब्द भगवान जगन्नाथाच्या विशाल रथाच्या संदर्भात आहे. दर वर्षी होणाऱ्या यात्रेमध्ये भाविकांकडून हा रथ तीन किलोमीटरचे अंतर ओढला जातो. यंदाची जगन्नाथ यात्रा २७ जून रोजी सुरू झाली असून, ती ५ जुलै रोजी संपणार आहे.
काय आहे इतिहास?‘जगन्नाथ’ या शब्दाबरोबरच, भारतीय भाषांनी इंग्रजी भाषा अनेक इतर शब्दांनी समृद्ध केली आहे. शाम्पू, मॅलिगटोनी सूप, कमरबंद, जोधपूर पँट्स, डाकू असे अनेक शब्द दिले. संशोधक आणि इतिहासकार अनिल धीर यांच्या मते, ‘जगन्नाथ’ हा शब्द म्हणजे दोन शक्तींमधील लढाई किंवा द्वंद्व आहे. इंग्रजी भाषा बोलणारे पाश्चिमात्य जग आणि भारत यांच्यातील तो एक बंध आहे.
रेव्ह क्लॉडियस बुकॅनन हे १८०० च्या सुरुवातीला ‘जगन्नाथ’ हा शब्द ब्रिटन आणि अमेरिकेत लोकप्रिय करणारे पहिले ब्रिटिश अधिकारी होते. बुकॅनन भारतात वास्तव्यास असणारे एक पाद्री होते आणि भारतातील ख्रिश्चन मिशनचे कट्टर समर्थक होते. बुकॅनन यांनी ‘जगन्नाथ’ या शब्दाचा अर्थ एका विकृत किंवा भयावह संकल्पनेचा उल्लेख करण्यासाठी केला होता. त्यांच्या मते, ‘जगन्नाथ’ हा शब्द एका हिंसक आणि घातक धार्मिक पंथासाठी आहे. त्या काळात रथयात्रेच्या वेळी रथाच्या चाकाखाली पडून अनेकांनी आत्महत्या केल्याचा संदर्भ बुकॅनन यांनी दिला होता.
प्रचंड शक्तीचे प्रतीकजगन्नाथ संस्कृती आणि इतिहासाचे संशोधक भास्कर मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार ‘जगन्नाथ’ हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. ‘जगत’ (विश्व) आणि ‘नाथ’ (स्वामी) या शब्दांपासून तो तयार झाला आहे. गेल्या तीन शतकांमध्ये ‘जगन्नाथ’ हा शब्द एका अडविल्या न जाणाऱ्या, आपल्या मार्गातील प्रत्येक गोष्टीवर मात करणाऱ्या शक्तीचा संदर्भ देण्यासाठी वापरला जाऊ लागला आहे. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार, ‘जगन्नाथ’ (juggernaut) या संज्ञेचा वापर इ. स. १६०० मध्ये आढळतो. ‘ऑक्सफर्ड’च्या माहितीनुसार, या शब्दाचा सर्वांत जुना पुरावा १६३८ मध्ये लेखक डब्ल्यू. ब्रुटन यांच्या प्रसिद्ध ग्रंथ ‘न्यूज फ्रॉम द ईस्ट-इंडीज, ऑर अ वॉयज टू बेंगाला’मध्ये आढळतो.
फूड चेन, कॉमिक पात्रएका लोकप्रिय दक्षिण भारतीय फूड चेनचे नाव असण्याबरोबरच, ‘जगन्नाथ’ (जगरनॉट) हा शब्द मार्वेल कॉमिक्सनेही प्रसिद्ध केला आहे. एक्स-मेन कॉमिक बुक्समधील काल्पनिक पात्र ‘जगरनॉट’ अलौकिक शक्तीचा धनी आहे. त्याचप्रमाणे, १ डिसेंबर २०२२ रोजी ‘मेक इन ओडिशा’ परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ‘‘आमच्या या जगरनॉटमध्ये सामील व्हा,’’ असे म्हटले होते. ‘जगन्नाथ’ या शब्दापासून दुसरा एक इंग्रजी शब्द ‘जॅकनेट’ हादेखील तयार झाला. ‘जॅकनेट’ हा एक हलका सूती कापडाचा प्रकार आहे. ‘ऑक्सफर्ड’ डिक्शनरीनुसार, ‘जॅकनेट’ हा ‘जगन्नाथ’ किंवा ‘जगन्नाथपुरी (कटक)’ या शब्दाचा अपभ्रंश आहे.
Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर *हिंदीतून आलेले इतर इंग्रजी शब्दशाम्पू : हा शब्द १८व्या शतकातील हिंदी शब्द ‘चाँपो’वरून (चंपी/मालिश करणे) आला आहे.
डकैत : हिंदीतील ‘डकैती’ (दरोडा) या शब्दाचे हे इंग्रजी रूपांतर आहे.
जोधपूर पँट : राजस्थानमधील जोधपूर शहरावरून घोडेस्वारीसाठी वापरण्यात येणाऱ्या पायघोळाला ‘जोधपूर पँट्स’ म्हटले गेले. पायात घट्ट असलेल्या या पँट जोधपूरचे राजकुमार प्रतापसिंह यांनी १८९७ मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या डायमंड ज्युबिली सोहळ्यातील पोलो सामन्यांमध्ये परिधान केल्यामुळे प्रसिद्ध झाल्या.
(* विविध भाषा अभ्यासकांनी संकलित केलेल्या माहितीवर आधारित)