तुम्ही सर्वांनी कोणत्या न कोणत्या कामासाठी AI चा वापर केलाच असेल, मात्र आम्ही तुम्हाला जर सांगितलं की एक महिला AI च्या जीवावर आपलं कर्ज फेडत आहे, तर हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार, मात्र ही खरी घटना आहे. जाणून घेऊयात जगणं -मरणाची लढाई लढत असलेल्या या महिलेनं कशापद्धतीनं AI च्या मदतीनं आपल्या कर्जाची परतफेड केली.
ही घटना आहे, अमेरिकेतल्या डेलावेयर येथील, जेनिफर असं या महिलेचं नाव आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला, मात्र त्याचवेळी काही मेडिकल एमर्जन्सीसाठी तिला पैशांची गरज भासली. तिच्यावर 20 लाख रुपयांचं क्रेडिट कार्डचं कर्ज झालं. ती पूर्णपणे कर्जात बुडाली होती. मात्र त्यानंतर तीने AI च्या मदतीनं अवघ्या एका महिन्यामध्ये दहा लाखांचं कर्ज फेडलं. जेनिफरची ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी बनली आहे. WION मधील एका रिपोर्टमध्ये या महिलेची यशोगाथा छापण्यात आली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार जेनिफरच आयुष्य सामान्य होतं, सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र त्यानंतर तीनं एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी निर्माण झालेल्या काही मेडिकल समस्यांमुळे या महिलेवर वीस लाखांचं कर्ज झालं. काय करावं? कर्ज कसं फेडावं? या महिलेला काहीच सूचत नव्हतं. कर्जामुळे तिला रात्री नीट शांत झोप देखील लागत नव्हती.
अखेर एक दिवस तीने हिंमत करून मोठ्या आशेनं AI ChatGPT कडे आपल्या कर्जासंदर्भात मदत मागितली, सल्ला मागितला. तेव्हा ChatGPT ने तिला तिच्या रोजच्या व्यवहारामध्ये छोटे-छोटे बदल करण्यास सांगितले. ते खूप सोपे होते. सगळ्यात पहिले जेनिफरने तिचे निरूपयोगी ज्याचा फारसा फायदा नाही असे सर्व सब्सक्रिप्शन बंद केले. त्यानंतर एआयने तिला तिचे जुने बँकेचे अकाऊंट चेक करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिने आपले जुने बँक खाते चेक केले. त्यामध्ये कधीकाळी तीने 8.50 लाख रुपये ठेवले होते, मात्र ती आता विसरून गेली होती. हे बँक खातं चेक करताच तिच्या हाती जॅकपॉट लागला. तिच्याकडे साडेआठ लाखांची रक्कम जमा झाली. तसेच तिने AI च्या सल्ल्यानुसार आपल्या आर्थिक व्यवहारात बचत केल्यानं तिच्या पैशांची सेव्हिंग्स देखील होऊ लागली, त्यातून वाचलेले पैसे आणि हे साडेआठ लाख रुपये असे एका महिन्यामध्ये या महिलेनं दहा लाख रुपयांचं कर्ज फेडलं आहे.