राज-उद्धव ठाकरे एकत्र, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सत्तेची मळमळ…
GH News July 05, 2025 09:06 PM

Eknath Shinde : सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र सभा घेतली. या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू 19 वर्षांनी एकत्र आले. त्यामुळे आता आगामी काही दिवसांत होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या भाषणात मराठीविषयीची तळमळ दिसली पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात सत्तेची, स्वार्थाची मळमळ दिसली, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला आहे. तसेच मराठी माणसांचा अपेक्षाभंग झाला आहे, असे म्हणत त्यांनी विजयी मेळाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. ते माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला?

आजचा मेळावा हा मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी असल्याचे सांगितले जात होते. पण ठाकरे यांच्या भाषणात आगपाखड होती. द्वेष, जळजळ, मळवळ होती. हे सगळं त्यांच्या भाषणात दिसून आलं. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? मुंबईतील मराठी लोकांचे प्रमाण का होत गेले. मराठी माणूस वसई-विरार, नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथ, वांगणी इथपर्यंत का बाहेर गेला? असा रोखठोक सवाल यावेळी शिंदे यांनी केला.

सत्ता आणि खुर्चीसाठीची मळमळ दिसली

तसेच, त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी माणसासाठी असलेली तळमळ दिसली. तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता आणि खुर्चीसाठीची मळमळ दिसली, अशी टीका शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरे माझ्यावर सातत्याने टीका करत असतात. पण मी त्यांच्या टीकेला उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर दिलं. त्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो. अडीच वर्षाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीतही आमचा मोठा विजय झाला, अशी उदाहरणं देत जनतेने उद्धव ठाकरेंना नाकारलं असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

..हे खूप दुर्दैवी

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावर बोलताना मराठी भाषेला आम्ही अभिजात दर्जा मिळवून दिला. आमच्या या मागणील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील लगेच होकार दिला. त्या मोदींनाही उद्धव ठाकरे यांनी सोडले नाही. हे दुर्दैवी आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच यातून त्यांची वृत्ती, त्यांची पोटदुखी दिसून आली. त्यांची लाचारी दिसून आली, असा टोलाही शिंदेंनी लगावला.

परत उठवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत चालू

तीन वर्षांपूर्वी 2022 साली आम्ही उठाव केला होता. अन्यायाच्या विरोधात आम्ही एकत्र आलो. तेव्हा ते आडवे झाले. तेव्हापासून ते सावरलेच नाहीत. ते आडवेच आहेत. त्यामुळे कोणाचातरी हात पकडून ते परत उठवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी शेलकी टीका शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला

आगामी काळात मुंबई पालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. यावर प्रश्न विचारल्यावर लोकशाहीमध्ये कोणालाही कोणासोबतही युती आणि आघाडी करण्याचा अधिकार आहे. निवडणुका जशा जवळ येतील, तशा अनेक घटना दिसतील. त्यामुळे मी सर्वांनाच शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी मराठीबद्दलची तळमळ बोलून दाखवली. आदित्य ठाकरे यांनी स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला. त्यामुळे पोटात काय ते ओठात आलं. मराठी माणसांचा अपेक्षाभंग झाला आहे, असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.