शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकदा एकाच मंचावर एकत्र दिसणार आहेत. दोघेही विजय रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. सत्तेमुळे दोन्ही भाऊ वेगळे झाले होते. मात्र त्यानंतर आज असा दिवस आला आहे की, जेव्हा हे दोन्ही भाऊ वरळीतील विजय रॅलीमध्ये पुन्हा एकत्र दिसणार आहेत. दोन्ही भावांमधील केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एवढंच नव्हे तर हे दोन्ही बंधू एखादा राजकीय संदेश देखील देऊ शकतात अशी अपेक्षा आहे.
मराठी भाषेवरील प्रेमामुळे दोन्ही भावांना पुन्हा एकदा एकाच मंचावर एकत्र येण्याची संधी मिळाली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अलिकडेच महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने त्रिभाषा धोरणाबाबत एक आदेश जारी केला होता. यावरून महाराष्ट्रात बराच वाद निर्माण झाला होता. मात्र दोन्ही ठाकरे बंधूंनी या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली. मोठा जनविरोध, राजकीय पक्षांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता राज्य सरकारने या आदेशावर यू-टर्न घेतला. तसेच हिंदी सक्तीबाबतच जीआर रद्द करण्यात आला. सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरे बंधूनी हा मराठी भाषेचा, मराठी माणसाचा विजय असल्याचे सांगत ते आज हा विजय साजरा करणार आहेत.
ठाकरे बंधू शेवटचे कधी एकत्र दिसले ?
तब्बल 20 वर्षांनी राजकीय मंचावर पुन्हा दिसणारे ठाकरे बंधू हे शेवटचे कधी एकत्र दिसले होते माहीत आहे का ? याआधी, राज आणि उद्धव हे दोघेही 2005 साली एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले होते. तो निवडणुकीचा प्रसंग होता, जेव्हा दोघेही मालवण विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. तेव्हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अविभाजित शिवसेना सोडली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनीदेखील त्याच वर्षी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर 2006 साली राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.
व्हिक्टरी रॅली कुठे ?
अखेर 20 वर्षांनी मराठीच्या मुद्यावर एकजूट दाखवत ठाकरे बंधू आज पुन्हा एकाच मंचावर दिसणार आहेत. ठाकरे बंधूंची ही विजयी रॅली वरळीतील एनएससीआय डोम येथे होणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि हजारो लोकं सामील होतील अशी अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी ही रॅली आयोजित केली जात आहे ती जागा शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघात येते.
या रॅलीत 50 हजार ते 1 लाख लोक एकत्र येतील, असे शिवसेना युबीटी नेते अरविंद सावंत म्हणाले. ठाकरे बंधू मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत. येत्या निवडणुकीत एकत्र राहायचे की नाही हे दोन्ही बंधूंनी ठरवायचे आहे. पण त्या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची लोकांची गरज आहे. देवाची इच्छा असेल ते होईल, असेहा सावंत म्हणाले. शिवसेना (यूबीटी) आणि मनसे या दोघांनीही कार्यक्रमादरम्यान कोणत्याही पक्षाचे झेंडे, बॅनर, निवडणूक चिन्ह, होर्डिंग्ज आणि स्कार्फ न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.