पलावा उड्डाणपूलच्या उद्घाटनानंतर अपघातांची मालिका, अर्ध्या तासात पूल बंद, ठाकरे गट अन् मनसेने साधला निशाणा
Tv9 Marathi July 05, 2025 04:45 PM

डोंबिवलीतील पलावा जंक्शनजवळील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात होता. मात्र अवघ्या अर्ध्या तासातच या पुलावर अपघातांची मालिका सुरू झाली. यामुळे प्रशासनाला पूल तात्पुरता बंद करावा लागला. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीत राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. पुलाच्या कामावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने शिवसेनेवर जोरदार हल्ला केला आहे. पुलाचे काम पूर्ण न होता उद्घाटन का केले गेले? जनतेच्या जीवाशी कोण खेळत आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी पोस्ट ठाकरे गटाने केली आहे.

पूल सुरु होताच अपघातांची मालिका

कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाकांक्षी समजला जाणारा पलावा उड्डाण पूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र उद्घाटनानंतर केवळ अर्ध्या तासातच पुलावर अपघातांची मालिका सुरू झाली. त्यानंतर तात्काळ पूल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या पुलाचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून खासगी कंत्राटदाराकडून करण्यात आले. पुलाच्या दोन मार्गिकांपैकी केवळ एकच मार्गिका सुरू करण्यात आली होती. यावरून वाहतूक सुरू होताच, वाहने स्लिप होऊ लागली. काही दुचाकीस्वार थेट रस्त्यावर पडले आणि अपघात घडले. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने शिवसेनेवर आरोप केले आहेत.

पलावा पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे व याबाबत मी त्या पुलाच्या गुणवत्तेच्या तपासणीची मागणी ही केली आहे. परंतु आज स्वतःला ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ म्हणवणारे कोणताही गाजावाजा न करता आपल्या समर्थकांकडून पुल सुरू करून मोकळे झाले खरे पण काही वेळातच हा पुल बंद करण्यात आला… pic.twitter.com/0fm0a4l8PS

— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase)

पुलाच्या दर्जावर प्रश्न?

शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत पूल सुरू करण्यात आला होता. पण यानंतरच ठाकरे गटाने यावर जोरदार टीका केली. काम अपूर्ण असूनही घाईघाईत उद्घाटन केले गेले, असा आरोप केला. तसेच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील या प्रकरणात उडी घेत पुलाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पूल निकृष्ट दर्जाचा आहे, मी यापूर्वीच याची चौकशी करण्याची मागणी केली होती, असे सांगत राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

काम अर्धवट असताना घाईघाईत पलावा पूल सुरू केला…
दुचाकीस्वार पडले, अपघात झाले, आणि दोन तासात पूल बंद!

⛔ शिवसैनिक या निष्काळजीपणाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देणार.

📢 जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना माफ नाही!#पलावा_पूल #शिवसेना #डोंबिवली…

— Dipesh Pundlik Mhatre (@Dipesh99Mhatre)

हिंदी, गुजरातीमधून पोस्ट

भैय्याजी हमार पुल ठीक है ना बा? ये छू छे गांडाभाई?” अशी पोस्ट मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी करत या पुलाच्या माध्यमातून चक्क हिंदी आणि गुजराती भाषेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच टीका केली आहे. दरम्यान शिवसैनिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी निवेदन देण्याची तयारी सुरू केली आहे. डोंबिवलीतील पलावा पूल वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आला होता. परंतु तोच पूल नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो, हे वास्तव समोर आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.