“राज ठाकरेंकडे बघायची उसंत नव्हती. आज त्यांना सन्मानीय राज ठाकरे बोलावं लागलं. यात उद्धव ठाकरेंचा सत्तेसाठीचा स्वार्थीपणा दिसून येतो” अशी टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली. तुम्ही मनसेमध्ये होता, राज ठाकरेंनी साथ सोडली, त्यामागे काय कारणं होती? “खऱ्या अर्थाने तेव्हा सन्मान करण्याची आवश्यकता होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी मोठं मन दाखवून महाबळेश्वरमध्ये जे अधिवेशन झालं, तिथे त्या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना नेमा हे मोठ्या मनाने राज ठाकरेंनी सांगितलं” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
“पण ज्यावेळी राज ठाकरेंना सन्मान देण्याची वेळ आली, तेव्हा राज ठाकरेंवर प्रेम असणाऱ्या समर्थकांना एक तिकीट उद्धव ठाकरेंनी दिलं नाही. महाराष्ट्रात एक तिकिट दिलं नाही, पद दिलं नाही. नेतृत्व करण्यासाठी असा एखादा जिल्हा द्या, जिथे शिवसेना नाही. त्यावेळी खूप सन्मान उद्धव ठाकरेंनी केला हे कोणी विसरु शकत नाही. आता आलेलं प्रेम हे पुतना मावशीच प्रेम आहे” अशी बोचरी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
‘फडणवीसांविषयी असूया, कावीळ’
“कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असला, तरी कायदा-सुव्यवस्था रहावी ही भूमिका असते. आंदोलन करायला काहीच हरकत नाही. पण आंदोलनाच्या आडून कोणी गुंडगिरी करत असेल, राजकीय स्वार्थ साधत असेल, तर ते चुकीचं आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले. उद्धव ठाकरेंनी भाषणात मोदींची शाळा काढली. त्यावर प्रवीण दरेकर म्हणाले की, “मला वाटतं भाषणा दरम्यान राजकीय विचार दिला असता, मराठी माणसाच्या हितासाठी Action प्लान दिला असता, तर मराठी माणसाला आनंद झाला असता. पण तिथे फडणवीसांविषयी असूया, कावीळ झाल्याच दिसलं”