माणगाव शिक्षण विभागाच्या वतीने संविधान जागर
‘घर घर संविधान’ उपक्रम आता जिल्हाभर राबविणार
माणगाव, ता. ५ (बातमीदार) ः भारतीय संविधानाचे महत्त्व समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी माणगाव तालुक्यातील शिक्षण विभागाने हाती घेतलेला ‘घर घर संविधान’ हा अभिनव उपक्रम यशस्वी ठरल आहे. २६ जून ‘सामाजिक न्यायदिन’ आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलै रोजी ना. म. जोशी विद्याभवन गोरेगाव येथे पार पडलेल्या भव्य गौरव सोहळ्यात संविधान उपक्रम दरवर्षी राबवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या संविधान गुणगौरव परीक्षेत हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या परीक्षेत तालुका स्तरावर पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन करण्यात आला. याव्यतिरिक्त, क्रीडा व नवोदय परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांनाही सन्मानित करण्यात आले.
रायगड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुनील भोपळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांच्यासोबतच, माणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, कुमार खामकर, धुळदेव कोळेकर, संजय पालांडे, शंकर शिंदे यासह अनेक केंद्रप्रमुख, शिक्षक, साधन व्यक्ती, तसेच चारिझेन फाउंडेशनचे पदाधिकारी कॅप्टन एन. एस. रंधावा, सतीश काळे, किशोर झेमसे हे उपस्थित होते. दीपप्रज्वलन, महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ना. म. जोशी विद्याभवनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ईशस्तवन व स्वागतगीत मनमोहक ठरले, तर संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने कार्यक्रमाला ऊर्जा मिळाली. मान्यवरांचे स्वागत रोप व पुस्तक देऊन अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
...................
संविधानाचा जागर आता निरंतर
गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांनी आपल्या प्रास्ताविकात या उपक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली आणि एक महत्त्वपूर्ण घोषणा केली की, हा उपक्रम केवळ एका वर्षापुरता मर्यादित नसून, शिक्षणाच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडवण्यासाठी ‘घर घर संविधान’ जनजागृतीचा उपक्रम माणगाव तालुक्यात दरवर्षी राबवण्यात येईल. या वर्षापासून, म्हणजेच ५ जुलैपासून, हा उपक्रम पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले, तर संविधान अभ्यासक नुरखाँ पठाण यांनी आपल्या मनोगतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी संविधान कसे वरदान ठरवले, याची आठवण करून दिली. ते म्हणाले, एक महिला अधिकारी म्हणून सुरेखा तांबट यांनी या संविधानाचे ऋण फेडण्याचे कार्य केले, हे अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यांनी हा उपक्रम संपूर्ण रायगड जिल्ह्यात राबवण्याची विनंती शिक्षणाधिकारी सुनील भोपळे यांनी केली.