Railway Local News: पती गाडीतून उतरला, पत्नी आतच, घाबरून धावत्या लोकलमधून उडी मारली, इतक्यात पोलीस देवदूत बनला अन्...
esakal July 06, 2025 05:45 AM

कैलास म्हामले

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकावर एका धावत्या लोकलमधून उडी मारणाऱ्या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस जवानाने जीवाची बाजी लावली. वेळेवर घेतलेली ही धाडसी कृती आता सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

दिनांक ५ जुलै रोजी सुनैना अखिलेश यादव (वय २५) व त्यांचे पती अखिलेश यादव (वय ३४), रा. शास्त्रीनगर, खोपोली हे दोघे कर्जत रेल्वे स्थानकावर आले होते. त्यांनी दुपारी ३.१५ वाजताची कर्जत–खोपोली लोकल पकडली. मात्र गाडी सुरू झाल्यानंतर अखिलेश यादव हे काही कारणास्तव प्लॅटफॉर्मवर उतरले आणि लोकल वेग पकडू लागली. पती गाडीत नाहीत हे लक्षात येताच सुनैना यादव यांनी कोणताही विचार न करता धावत्या लोकलमधून उडी मारली.

दरम्यान, ही घटना पाहून गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र मोतीलाल बागुल (हवालदार क्र. 875) यांनी प्रसंगावधान राखून व जीव धोक्यात घालून संबंधित महिलेची गाडीखाली जाण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मवर खेचून तिचे प्राण वाचवले.

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. याबाबत कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात जखमी नोंद क्र. 81/2025 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या पराक्रमी कृतीबद्दल महिलेने व तिच्या पतीने पोलीस हवालदार बागुल व कर्जत रेल्वे पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

तसेच या धाडसी कृतीसाठी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांनी देखील पो.हवा. बागुल यांचे अभिनंदन करत त्यांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे.

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.