>> डॉ. अविनाश भॉन्डवे
सुंदर दिसायला कोणाला आवडणार नाही, पण निसर्गचक्र थांबत नाही आणि वार्धक्याच्या खुणा दिसू लागतात. वय वाढू लागते तसे अंतर्गत बदल घडू लागतात. हे बदल थोपवण्यासाठी हल्ली अँटी एजिंग उपचार घेण्याकडे कल वाढला आहे, परंतु सुंदर दिसण्याची ही असोशी नुकसानदेखील करू शकते. ‘एजिंग’ ही टाळता येण्यासारखी गोष्ट नाही. परंतु आपल्या गरजा व मर्यादा ओळखून या उपचारांचा पर्याय निवडावा.
आपण सुंदर आणि तरुण दिसावे यासाठी माणसाची धडपड युगानुयुगे सुरू आहे, पण सोशल मीडियाने नखशिखांत भारून गेलेल्या आजच्या युगात सुंदर दिसणे आणि तरुण राहणे या संकल्पनांचे आकर्षण अतोनात वाढत आहे. वय वर्षे 35 ते 70 या वयोगटातील अनेक स्त्राr-पुरुष अँटी एजिंग उपचारांकडे आकर्षित होताना आढळतात. मात्र या उपचारांमधून उद्भवणारे गंभीर धोके, त्यांचे जीवघेणे परिणाम आणि गेल्या काही काळात सेलिब्रिटींबाबत घडलेल्या घटना यामुळे या उपचारांमागे दडलेल्या वस्तुस्थितीची जाणीव प्रत्येकालाच असायला हवी.
वयाच्या चाळिशीनंतर वृद्धत्वाची सर्वसामान्य लक्षणे हळूहळू दर्शन देऊ लागतात. त्वचेमधील कोलॅजन आणि इलॅस्टिनची निर्मिती कमी झाल्यामुळे चेहऱयावर सुरकुत्या आणि डोळ्यांच्या खोबणीच्या कोपऱयात कावळ्याच्या पायांसारख्या रेषा उमटतात. तसेच सूर्यप्रकाशामुळे अंगावर काळसर रंगाचे डाग उमटू लागतात. त्वचा एखाद्या पापुद्रय़ासारखी पातळ आणि निस्तेज बनते. केस विरळ होऊन आधी करडे आणि मग पांढरे होऊ लागतात. वाढते वय दडवण्यासाठी केल्या जाणाऱया उपचारांना अँटी एजिंग उपचार म्हणतात. वयोमानानुसार त्वचेवर उमटणारी वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी ते केले जातात. या उपचारांमध्ये विविध प्रकार आणि औषधांचा समावेश होतो.
– बोटॉक्स आणि डर्मल फिलर्सः चेहऱ्यावरील सुरकुत्या, कडक रेषा मिटवण्यासाठी आणि चेहऱयावर लोंबणाऱया त्वचेचा सैलपणा कमी करण्यासाठी हा इलाज केला जातो.
– लेझर थेरपी आणि रेडिओफ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट्स : सैलावलेली त्वचा घट्ट करण्यासाठी आणि कोलॅजनची निर्मिती वाढवण्यासाठी हा अत्याधुनिक उपचार केला जातो.
– ग्लूटाथायोन आणि व्हिटॅमिन सी शिरेतून घेणे : त्वचा उजळ करण्यासाठी आणि त्वचेत जमा झालेल्या दूषित पदार्थांचा निचरा होण्यासाठी (डिटॉक्स) ही औषधे शिरेतून घेतली जातात.
– हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी : स्त्रियांमधील इस्ट्रोजेन हा तरुण्याशी संबंधित हॉर्मोन असतो, त्याची कमतरता भरून काढण्यासाठी त्याच्या गोळ्या घेतल्या जातात. पुरुषांमध्ये स्नायूंची तशीच लैंगिकतेमधील कमकुवतपणा भरून काढण्यासाठी टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनची इंजेक्शने दिली जातात.
– टॉपिकल रेटिनॉइड्स आणि स्किन बूस्टर्स : त्वचेला पोषण देण्यासाठी आणि कोलॅजन वाढवण्यासाठी.
– हृदयविकार : विशेषत जेव्हा उपचार जेव्हा उपाशीपोटी घेतले जातात, तेव्हा रक्तदाबात अचानक घट होऊन हृदय अचानक बंद पडू शकते (कार्डिअॅक अरेस्ट).
– यकृत आणि मूत्रपिंडावर ताण : दीर्घकाळ ग्लूटाथायोन किंवा इतर औषधे शिरेमधून घेतल्यास.
– हॉर्मोन्सचे असंतुलन : हॉर्मोन रिप्लेसमेंट उपचार किंवा ग्रोथ हॉर्मोनचा डोस अवास्तवरीत्या जास्त दिला गेल्यास.
– त्वचेला इजा :चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या मात्रेमध्ये बोटॉक्स किंवा फिलर्स दिल्यास त्वचा काळी पडणे, सूज येणे किंवा चेहऱयाच्या दोन्ही बाजूत असमतोल निर्माण होणे अशी लक्षणे आढळतात. व्यक्ती सुंदर दिसण्याऐवजी जास्तच कुरूप दिसू लागते.
– मानसिक आरोग्यावर परिणाम : आपण हवे तसे तरुण दिसत नाही या मानसिक दबावामुळे आत्मविश्वास कमी होणे, चिंता वाढणे अशा मनोविकारांना चालना मिळते.
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे नुकतेच निधन झाले. वर्तमानपत्रात आलेल्या माहितीनुसार ती गेल्या 6-7 वर्षांपासून अँटी एजिंग उपचार घेत होती. तिला नियमितपणे ग्लूटाथायोन आणि व्हिटॅमिन सी ची इंजेक्शन्स शिरेतून दिली जात असत. त्या दिवशी तिचा उपवास असल्यामुळे तिने उपाशीपोटी शिरेतून घेतलेल्या या उपचारांमुळे तिचा रक्तदाब अचानक घसरला आणि तिच्या हृदयाचे स्पंदन बंद पडले असावे, असा तिच्या डॉक्टरांचा अंदाज आहे. तर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिनेदेखील सौंदर्य टिकवण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केल्याचे अभिनेत्री पायल घोष यांनी उघड केले होते. 2017 मध्ये एका क्लिनिकमध्ये झालेल्या भेटीत श्रीदेवीने स्वत कबूल केले होते की, वृद्धत्वाची भीती वाटत असल्यामुळे तिने सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया करून घेतली होती आणि वजन कमी ठेवण्यासाठी ती दीर्घकाळ उपाशी राहते.
प्रमाणित व अनुभवी त्वचारोग तज्ञांकडूनच सल्ला आणि उपचार घ्यावा. ? उपचारांपूर्वी पूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. शारीरिक स्थितीमधले दोष आणि आजार उपचाराआधीच समजून घेणे महत्त्वाचे असते. ? सौंदर्यवर्धनासाठी नैसर्गिक उपाय करावेत. ? संतुलित आहार घ्यावा. ? नियमित व्यायाम व पुरेशी झोप घ्यावी. ? तणाव नियंत्रणात ठेवावा. त्यासाठी मेडिटेशन, रीलॅक्सिंग टेकनिक्स वापरावीत.
एक गोष्ट लक्षात घ्यावी की, सोशल मीडियावरच्या ट्रेंड्सवर अंधपणे विश्वास ठेवू नये. त्यातल्या रील्स आणि फोटोंमध्ये दाखवलेले सौंदर्याची वास्तवाशी नेहमीच मोठी फारकत असते. तरुण आणि अधिक सुंदर दिसण्यासाठी आपल्या जिवाची किंमत मोजू नये. शेफाली जरीवाला आणि श्रीदेवी यांचे अनुभव आपल्याला शिकवतात की स्वप्रतिमा, आत्मप्रेम, जीवनशैली आणि आरोग्य यांच्याशी तडजोड न करता साध्या उपायांनी अधिक तरुण राहता येते.
– avinash.bhondwe@gmail.com
(लेखक आयएमएचे माजी अध्यक्ष आहेत.)