बांगलादेश भारतात मूत्रपिंडांची विक्री करीत आहे
Marathi July 06, 2025 09:25 AM

पश्चिम बंगालमध्ये रॅकेट : संपूर्ण गाव तस्करीच्या विळख्यात

वृत्तसंस्था/ ढाका/कोलकाता

वायव्य बांगलादेशातील जॉयपुरहाट जिह्यातील बैगुनी हे छोटेसे गाव आता ‘वन किडनी व्हिलेज’ म्हणून ओळखले जात आहे. येथील बऱ्याच लोकांनी किडनी विकल्याचा प्रकार उघड झाला आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या या बेकायदेशीर अवयव तस्करीने अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. या व्यवहारांमागे गरिबी, खोटी आश्वासने आणि आंतरराष्ट्रीय अवयव तस्करीचे एक संघटित रॅकेट असून त्याचे नेटवर्क बांगलादेशपासून भारतापर्यंत पसरलेले आहे.

45 वर्षीय सफिरुद्दीन नामक एका बांगलादेशी रहिवाशाने मागील वर्षी भारतात येऊन आपली किडनी 2.5 लाख रुपयांना विकली. त्याचे ध्येय गरिबीतून सुटणे आणि त्याच्या तीन मुलांसाठी घर बांधणे हे होते. पण सध्या त्याचे घराचे स्वप्न अपूर्ण असून त्याला आरोग्याच्या समस्याही भेडसावत आहेत. सध्या त्याच्याकडे काम करण्याची ताकदही उरलेली नाही.

किडनी तस्करी रॅकेटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे.  मध्यस्थ, कागदपत्रे तयार करणारे, रुग्णालय कर्मचारी, डॉक्टर आणि खासगी दवाखाने यांच्याशी संबंधित अनेक लोक यात गुंतलेले दिसून येतात. या व्यवहारामध्ये किडनी विकणाऱ्याला अडीच ते चार लाख रुपये दिले जात असले तरी हा व्यवहार 18 ते 22 लाख रुपयांपर्यंत असल्याची माहितीही पुढे आली आहे. काही प्रकरणांमध्ये लोकांना नोकरीच्या बहाण्याने भारतात आणून नंतर फसवणूक करून शस्त्रक्रिया करायला लावली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

कायदेशीर कारवाई अद्याप अपुरी

किडनी रॅकेट प्रकरणात तस्करीत सहभागी असलेल्या अनेक मध्यस्थांना अटक केली असल्याचे बांगलादेश पोलिसांनी सांगितले. भारतातही जुलै 2024 मध्ये, दिल्ली पोलिसांनी एका महिला सर्जनला 15 बेकायदेशीर प्रत्यारोपणात सहभागी असल्याबद्दल अटक केली. परंतु ही कारवाई हे संपूर्ण नेटवर्क संपवण्यासाठी पुरेशी नसून पूर्णपणे पायबंद घालण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.