आजच्या फॅशनच्या जगात ब्रँडेड कपड्यांना खूप महत्त्व दिलं जातं. शर्ट, टी-शर्ट, जॅकेट्स यांसारख्या कपड्यांमध्ये बहुतांश लोक ब्रँडेड पर्याय निवडतात. ब्रँड हे केवळ क्वालिटीसाठी नाही तर स्टाइल आणि ओळखीचंही प्रतीक मानलं जातं. अशा वेळी एक गोष्ट तुम्ही नक्कीच पाहिली असेल बहुतेक ब्रँडेड कपड्यांवर त्यांचा लोगो डाव्या बाजूला असतो. पण का?
सर्वसामान्यपणे असं वाटतं की हा फक्त डिझाईनचा भाग असावा. पण प्रत्यक्षात, यामागे एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय असतो जो ब्रँडिंग, मानसशास्त्र आणि वापरकर्त्याच्या भावनांशी जोडलेला असतो.
आपलं हृदय शरीराच्या डाव्या बाजूला असतं, ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शर्ट, टी-शर्ट किंवा जॅकेटवर लोगो डाव्या बाजूला लावलेला असतो, तेव्हा तो ‘दिलाच्या जवळचा’ वाटतो. यामधून ब्रँड आणि ग्राहक यांच्यात एक प्रकारचं भावनिक नातं निर्माण होतं. एक नजरेला भिडणारं, आणि मनात घर करणारं चिन्ह म्हणून लोगो डावीकडे दिला जातो.
दुसऱ्या कारणाकडे पाहिलं तर, मानवी मेंदू डाव्या बाजूच्या गोष्टींना आधी ओळखतो. मेंदूची एक नैसर्गिक क्रिया अशी असते की, समोर काही आलं की नजर सर्वप्रथम डावीकडे जाते. त्यामुळे कपड्यावर डाव्या बाजूला असलेला लोगो लगेचच लक्ष वेधतो. यामुळे कपड्याची ओळख, ब्रँडचं नाव किंवा चिन्ह झटपट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं.
तुम्ही लक्षात घेतलं असेल, की अनेक शालेय गणवेशांमध्ये, पोलिस किंवा लष्कराच्या युनिफॉर्ममध्ये नाव किंवा रँक डाव्या बाजूला असतो. हे केवळ एक योगायोग नाही, तर ही सवय अनेक क्षेत्रांमध्ये वापरली जाते. फॅशन इंडस्ट्रीतही हीच पद्धत स्वीकारली गेली आहे. त्यामुळे अनेक ब्रँड्स आपले लोगो डावीकडेच लावतात.
हे केवळ दृश्य सौंदर्य वाढवण्यासाठी नसतं. यामागचा हेतू म्हणजे लोकांच्या मनात त्या लोगोची, त्या डिझाईनची एक ठसठशीत छाप निर्माण करणे. जेव्हा ग्राहक पुन्हा तोच कपडा पाहतो किंवा वापरतो, तेव्हा डावीकडील लोगो लगेच ओळखता येतो. हाच भाग त्या कपड्याची ओळख ठरतो.
इतकंच नव्हे, तर डाव्या बाजूवरचा लोगो खरा आणि बनावट कपड्यांमध्ये फरक ओळखण्यासाठीही उपयुक्त ठरतो. जर लोगो नेहमीच्या जागी नसेल, तर त्या कपड्याची शंका घ्यायला हरकत नाही.
म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही ब्रँडेड कपडे खरेदी करत असाल, तेव्हा त्यावरील लोगो कुठे आहे याकडे लक्ष द्या. कारण तो केवळ स्टाइलचा भाग नसून, तुमचं त्या कपड्याशी, त्या ओळखीशी आणि त्या भावनांशी जोडलेलं नातं दर्शवतो.