ईडीच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर सुनावणी करताना नवी दिल्लीतील विशेष न्यायालयाने ब्रिटनस्थित शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित केले आहे. ही कारवाई फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 अंतर्गत करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्थिक गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या भंडारीची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा उद्देश साध्य होणार आहे. संजय भंडारी याच्यावर काळा पैसा, मनी लाँडरिंग आणि परदेशात बेकायदेशीर मालमत्ता जमविणे यासारखे गंभीर आरोप आहेत. आपण सध्या लंडनमध्ये कायदेशीररित्या राहत असून यूके न्यायालयाने भारताची प्रत्यार्पणाची विनंती फेटाळल्यामुळे आपल्या भारतीय कायद्यानुसार फरार घोषित करता येणार नाही, असा युक्तिवाद भंडारीच्यावतीने करण्यात आला. परंतु न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळत ईडीच्या बाजूने निकाल दिल्यामुळे आता भारत आणि परदेशातील त्याच्या मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय भंडारी यांचेही नाव पुढे आले होते. भंडारी याने संरक्षण करारांमध्ये दलाली करून परदेशात कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता कमावली असल्याचा ईडीचा दावा आहे. 2016 मध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यादरम्यान भंडारींकडून गोपनीय संरक्षण कागदपत्रे आणि अघोषित परदेशी मालमत्तेचे पुरावे सापडले होते.