'ध'चा 'मा'; जसं घडलं तसं!
esakal July 06, 2025 09:45 AM

गणाधीश प्रभुदेसाई-editor@esakal.com

नारायणराव पेशवा यांचा खून ते पहिल्या आंग्ल मराठा युद्धाची सुरुवात असा सुमारे अडीच ते तीन वर्षांचा कालखंड अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यात डॉ. उदय कुलकर्णी यांना यश आले आहे. ‘राघोबा : दी असॅसिनेशन ऑफ नारायणराव पेशवा’ या त्यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. विजय बापये यांनी केला आहे. ‘राघोबा : नारायणराव पेशव्याचा खून’ या मराठी अनुवादित पुस्तकामुळे डॉ. कुलकर्णी यांचे अभ्यासपूर्ण लेखन मराठी वाचकांपुढे आले आहे.

नारायणराव पेशवा यांचा खून आणि त्याभोवतीचा इतिहास हा खूप क्लिष्ट आहे. पण तो वाचकांपुढे अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यात डॉ. कुलकर्णी यशस्वी ठरल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी पुस्तकाच्या प्रकाशन वेळी सांगितल्याने पुस्तकाबद्दलचे कुतूहल वाढले नाही, तरच नवल. राघोबादादा, नारायणराव, तुळाजी पवार, गारदी मंडळी, नागपूरचा सत्तासंघर्ष, होळकर, शिंदे आदी व्यक्तींबाबतच्या अनेक अज्ञात गोष्टी या पुस्तकात आहेत. नारायणराव पेशव्याच्या हत्येने कलंकित झालेल्या मराठा इतिहासाच्या काळ्याकुट्ट कालखंडातील साऱ्या व्यक्तिरेखा वाचनीय पद्धतीने इथे मांडल्या आहेत.

नारायणराव पेशवे म्हटले की सर्वसामान्यांना फक्त ‘ध’चा ‘मा’ एवढेच आठवते किंवा ठाऊक आहे. पण हे पुस्तक त्यापुढे जाऊन इतिहास प्रेमी व विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ ठरला आहे. यात काल्पनिक चित्रण अजिबात नसून जे घडले होते ते संदर्भासह रंजकपणे सादर केलेले आहे. मराठीत अनुवाद करताना डॉ. बापये यांनी मूळ लिखाणाला कुठेही धक्का लावू दिलेला नाही. प्रामुख्याने १७७०च्या दशकाच्या सुरुवातीच्या आणि मध्यावरच्या कालखंडात घडत गेलेल्या राजकीय घटनांचे कथन यात आहे. या पुस्तकात लेखक सर्व पात्रांचे आणि घटनांचे अचूक वास्तवादी दर्शन घडवतात. आणि हे करताना तटस्थ राहून लेखन केलेले दिसते. कारण कुणाचं चूक किंवा बरोबर, निर्णय योग्य किंवा अयोग्य हे सांगण्याचे लेखकाने टाळले आहे. ‘असं घडलं आणि हा आहे संदर्भ’ ही चौकट लेखकाने स्वतःला घालून दिलेली आहे व ती कुठेही तोडलेली नाही. ‘वाचकहो पुस्तक वाचा व तुम्हीच ठरवा’ ही लेखकाची भूमिका आहे.

त्या काळातील पत्रव्यवहारही वाचण्यासारखा आहे. नारायणरावचा खून व त्या पार्श्वभूमीवर आधारित प्रदीर्घ शोकगीत पांडुरंग नावाच्या कवीने लिहिलं होतं. ते या पुस्तकात वाचायला मिळते. रावबहादूर म. वि. धुरंधर यांनी काढलेले नारायणराव पेशवा खुनाचे मूळ चित्र पुस्तकात आहे. रघुनाथराव कर्नाटकात असताना नारायणरावाची विधवा पत्नी गरोदर असल्याची बातमी त्याच्या कानावर आली. त्यानंतर जे घडलं ते नाट्य वाचल्यानंतर अंगावर काटा येतो.

ऐतिहासिक घटना व त्याची संदर्भासहित माहिती देणाऱ्या डॉ. कुलकर्णी यांचे हे आठवे इंग्रजी पुस्तक असून विजय बापये यांनी केलेला हा पाचवा मराठी अनुवाद झालेला आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी त्यांना १८ महिन्यांचा कालावधी लागला. नारायणराव पेशवा यांच्या खुनासंबंधीची बखर या पुस्तकात वाचायला मिळते. इंग्लंडमधील रॉयल ॲशियाटिकमधून त्यांनी या बखरीची प्रत मिळविली आहे. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात शनिवारवाड्याचा १७९६ मधील नकाश आहे. खुनाच्या वेळी कोण कोठून शिरले, कोठून पळाले याचा उल्लेख त्यात आहे. डेक्कन कॉलेजमधून हा नकाशा त्यांनी मिळविला आहे. १७७२ पासूनचा घटनाक्रम यात आहे. एकूण ११ नकाशे आणि २६ चित्रांचाही समावेश पुस्तकात केलेला आहे. विविध वंशावळी, पात्रपरिचय, माहितीपर परिशिष्टे आणि आकर्षक चित्रे यांचा समावेश हे पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या सर्वांचा विचार केला असता पुस्तक निर्मितीसाठी लागलेल्या १८ महिन्यांच्या काळात लेखक म्हणून संशोधनासाठी आणि सर्व संदर्भ गोळा करण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांनी घेतलेली मेहनत लक्षात येते.

Premium| Emoscape AI: आता फक्त चेहऱ्यावरील भाव पाहून एआय तुमच्या मनातील भावना ओळखणार !

थोडक्यात या पुस्तकात नारायणराव पेशवा याची नऊ महिन्याची कारकीर्द व तिचा अचानक झालेला अंत याचा वस्तुनिष्ठ वृत्तांत दिला आहे. मराठा इतिहासातील एक दुर्दैवी पर्वाची व एकमेव राजकीय खुनाची ही सत्यकथा इतिहासप्रेमी तसेच इतिहासाच्या अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी वाचण्यासारखी नक्की आहे. कारण ही ऐतिहासिक कादंबरी नसून एक मौल्यवान संदर्भग्रंथ व दस्तऐवज ठरला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.