‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ या संत उक्तीप्रमाणे अवघी पंढरी नगरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून आलेल्या 15 लाखांवर वारकरी भाविकांनी फुलून गेली असून, टाळमृदुंगाचा मधुर निनाद आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या राम कृष्ण हरीच्या नामघोषात सारेच तल्लीन झाले आहेत. उद्या साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विविध राज्यांतून निघालेल्या दिंड्या आणि पालख्यांचे मोठ्या उत्साहात पंढरीत आगमन होते आहे. आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
वाखरी पालखी तळावरून पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवतच पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. भक्तिरसात पावसाचा शिडकाव झाल्याने वारकऱ्यांच्या भक्तीला अधिकच उधाण झाले. जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला असल्याने राज्यभरातून व परराज्यांतून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला असल्याचे चित्र दिसून येत आहे. पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता एसटी, रेल्वे, खासगी वाहनांची तसेच पालख्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. 5200 जादा बसेस आषाढिकरिता सोडल्या आहेत. जादा रेल्वे गाड्यादेखील धावत आहेत. तर खासगी वाहनाने देखील भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. 18 ठिकाणी पार्किंग उभारण्यात आली आहेत. चंद्रभागा वाळवंट, भक्तीसागर 65 एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे.
पदस्पर्श दर्शनासाठी 12 तासांची प्रतीक्षा
यंदा भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे दर्शन रांग 7 कि.मी. अंतरावर पोहोचली आहे. भाविक पदस्पर्श दर्शन घेण्यास उत्सुक असतात. त्यामुळे दर्शन रांगेत उभारत आहेत. दर्शन रांगदेखील मंदिरापासून पुढे सारडा भवन, पत्राशेडमध्ये दाखल झाली आहे. येथील 12 दर्शन शेड भरून दर्शन रांग गोपाळपूरच्या दिशेने मागे सरकली आहे. गोपाळपूर येथील दोन जर्मन हँगर भरून दर्शन रांग पुढे स्वेरी कॉलेजपर्यंत पोहोचली आहे. दर्शनासाठी 10 ते 12 तासांचा कालावधी लागत असल्याचे भाविक जनार्धन भोसले यांनी सांगितले. तर मुखदर्शनासाठी किमान 3 ते 4 तास लागत आहेत.
आठ हजारावर पोलीस, सीसीटीव्हीची नजर
8,117 पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तर 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर भाविकांवर आहे. 10 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 14 प्रशिक्षित पथके तर 7 ठिकाणी मदत व प्रतिसाद केंद्र, 10 ठिकाणी होडी नियंत्रक पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच तीन ठिकाणी मुख्यमंत्री सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रात भाविकांसाठी राहण्यासाठी निवारा, फुट मसाज, आरोग्य केंद्राचा समावेश आहे.