पावसाळा सुरू झाला की अनेक कुटुंबं सहलीसाठी निघतात. त्यात ट्रेनने प्रवास करणे हे नेहमीच एक वेगळं आकर्षण असतं. पण जर आपल्या सोबत लहान मुले असतील, तर हा अनुभव आनंददायक ठरण्याऐवजी त्रासदायक होऊ शकतो, जर काही आवश्यक गोष्टींची काळजी घेतली नाही तर. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या ‘Parenting Tips’ सांगणार आहोत, ज्या ट्रेन प्रवासात खूप उपयोगी पडतील.
पॅकिंग करताना काय लक्षात घ्याल?
ट्रेनमध्ये लहान मुलांसोबत जात असाल, तर पॅकिंग करताना त्यांच्यासाठी विशेष तयारी आवश्यक आहे. मुलांच्या आवडीचे खेळणी, रंगीबेरंगी पुस्तके, थोडेसे स्नॅक्स, पाण्याची बाटली, आणि हवामानानुसार कपडे या गोष्टी विसरू नका. अनेक वेळा मुले कंटाळा किंवा चिडचिड करतात, त्यामुळे त्यांना गुंतवण्यासाठी हे साहित्य उपयोगी ठरतं.
झोपेची व्यवस्था ठरवा
जर मुलं अगदी लहान असतील, तर त्यांना आपल्या जवळच झोपवा. पण जर थोडी मोठी असतील, तर त्यांच्या नावावर स्वतंत्र तिकीट काढून त्यांच्यासाठी सुरक्षित जागा ठरवा.
मेडिकल किट आवश्यक
प्रवासात सर्दी, ताप, उलट्या, त्रासदायक चक्कर यांसाठी प्राथमिक औषधांचा एक मेडिकल किट सोबत ठेवा. यात लहान मुलांसाठी लागणारी खास औषधे हव्यात. ट्रेनमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे ही काळजी आवश्यक आहे.
स्वच्छतेची काळजी घ्या
ट्रेनमधील सीट्स, खिडक्या किंवा टॉयलेट स्वच्छ नसू शकतात. त्यामुळे मुलांना वेळोवेळी हँड सॅनिटायझर लावणं, त्यांच्यासाठी स्वच्छ बेडशीट, वेट वाइप्स या गोष्टी घेऊन जाणं फायदेशीर ठरतं.
मुलांच्या अन्नपाण्याची तयारी ठेवा
मुलांच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतली नाही, तर प्रवासात त्यांची तब्येत बिघडू शकते. थर्मस मध्ये गरम दूध घेऊन जा. जेणेकरून मुलांना वेळच्यावेळी दूध देता येईल. बाहेरचं खाणं शक्यतो टाळा आणि घरी बनवलेले हलके स्नॅक्स द्या.
मुलांना कधीच एकटे सोडू नका
प्रवासादरम्यान मुले अनेकदा उत्सुक असतात. तेव्हा त्यांना स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये एकटे सोडणे टाळा, त्यांच्यावर नेहमी नजर ठेवा. कधी-कधी मुलं इतर प्रवाशांना त्रास देऊ शकतात, त्यामुळे आधीच त्यांना समजावून सांगणं चांगलं.