हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसान हजेरी लावली, मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. अंधेरीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सबवेमध्ये पाणी साचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुंबईमध्ये सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र तरी देखील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे.
वसई विरारला पावसानं झोडपलं
दुसरीकडे पालघर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. वसई आणि विराराला पावसानं चांगलंच झोडपलं आहे. या पावसामुळे सायंकाळी घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल सुरू आहेत. सकल भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, रात्री देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कल्याण आणि डोंबिवलीतही पाऊस
दरम्यान आज सकाळपासून कल्याण आणि डोंबिवली परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. काही वेळा हलक्या सरी तर अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला असला तरी हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार शहरात रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.
भिवंडीतही पाऊस
भिवंडीत दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील, तीनबत्ती बाजारपेठेमध्ये पाणी साचलं आहे. अनेक छोट्या-मोठ्या दुकानात पाणी शिरल्याचा घटना देखील घडल्या. या पावसामुळे व्यावसायिकांचे चांगलेच हाल झाले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ
दरम्यान दुसरीकडे नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलं आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर रामकुंडातील पाणी वाढले आहे. गंगापूर धरणातून पाच हजार 186 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आधी 4 हजार 656 क्युसेस वेगानं सुरू असलेला विसर्ग 530 ने वाढवून 5 हजार 186 करण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.