पिंपरी : बांधकाम साइटवरील स्टोअर रूम फोडून अज्ञात चोरट्याने दोन लाख २२ हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केली. ही घटना डुडुळगाव येथील ‘डिस्टीनेशन ऑस्टीया’ येथे घडली. याप्रकरणी गिरीष दिलीप काळे (रा. पर्ल रेसिडेन्सी, रूम नं. ६०४, प्रेरणा बँकेजवळ, रावेत, पुणे) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा डुडुळगाव येथील डी. आर. गव्हाणे लँडमार्क कंपनीच्या ‘डिस्टीनेशन ऑस्टीया’ या साइटवरील स्टोअर रूमचे कुलूप तोडून आत शिरला. त्यानंतर दोन लाख २२ हजार ४६५ रुपयांचे साहित्य चोरून नेले.
वृद्धेचे ३० हजारांचे दागिने चोरले
पिंपरी : वृद्ध महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी वृद्ध महिलेकडील ३० हजारांचे सोन्याचे दागिने चोरले. ही घटना पिंपरीतील जमतानी चौक येथे घडली. याप्रकरणी ७० वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी या जमतानी चौकाजवळ रस्ता ओलांडत असताना दोन चोरट्यांनी त्यांना मदतीचा हात देत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेला बटवा घेऊन पसार झाले. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
महिलेची २१ लाखांची फसवणूक
पिंपरी : ‘सीबीआय अधिकारी’, ‘सुप्रीम कोर्ट न्यायाधीश’ असल्याची बतावणी करीत तसेच मनी लॉन्ड्रींग केसमध्ये अटक करण्याची भीती घालून एका महिलेची २१ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. या प्रकरणी पिंपळे सौदागर येथील ३९ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीला ट्रॉय डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या आधार कार्डचा वापर करून सिम काढल्याची माहिती दिली. या कार्डवरून अश्लील फोटो, व्हिडिओ, मैसेज पाठविल्याप्रकरणी तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची केस दाखल असून त्याचा तपास करीत असल्याचे फिर्यादीला भासवले. सीबीआय डायरेक्टर आणि सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश असल्याची तोतयागिरी केली. तसेच मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक करण्याची भीती घालून फिर्यादीच्या बँक खात्यातील रक्कम डिजिटल करन्सी चेक करून ती व्हेरिफाय करून परत करतो, असे सांगून फिर्यादीकडून जबरदस्तीने, २१ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा
पिंपरी : लिफ्टच्या सुरक्षा भिंतीचे काम करीत असताना उंचावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी कंपनीवर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चिंचवड एमआयडीसीतील साईटेक इंजिनिअरिंग कंपनी येथे घडली. संतोष राम माने (वय ४०) असे या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव असून याप्रकरणी त्यांच्या ३८ वर्षीय पत्नीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साईटेक इंजिनिअरिंग कंपनीचे मालक साईनाथ शिंदे (रा. मोशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचे पती संतोष माने साईटेक इंजिनिअरिंग कंपनी येथे तिसऱ्या मजल्यावर लिफ्टच्या संरक्षण
भिंतीचे काम करीत होते. त्यावेळी त्यांना सुरक्षिततेसाठी कंपनी मालकाने हेल्मेट व सुरक्षा बेल्ट दिले नव्हते. दरम्यान, काम करीत असताना संतोष माने हे लिफ्टच्या खाली असलेल्या लोखंडी फाउंडेशनवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. माने याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साईनाथ शिंदे या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी
पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना चऱ्होली बुद्रूक परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ घडली. तानाजी शिवाजी खांडेकर (वय ६०, रा. माउली निवास, शिवाजी वाडी, गल्ली नं. १, मोशी) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून याप्रकरणी त्यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह दुचाकीने जात असताना अज्ञात ट्रक चालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत त्यांच्या दुचाकीस मागून जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. तर त्यांचे मित्र प्रीतम महाले किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
---