नवी मुंबईकरांना खड्ड्यांनी केले त्रस्त
esakal July 06, 2025 11:45 PM

नवी मुंबईकर खड्ड्यांनी त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त
खड्ड्यांमधून मार्गक्रमण करणे वाहनचालकांना त्रासदायक
जुईनगर, ता. ६ (बातमीदार) : नवी मुंबईमधील वाशी, सानपाडा आणि जुईनगर परिसरात खड्ड्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमधून मार्गक्रमण करणे वाहनचालकांना त्रासदायक ठरत असून, याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त दिसत आहेत. पावसाचा जोर कमी असतानादेखील प्रशासन खड्डे बुजवत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
वाशी येथील कर्मवीर भाऊराव महाविद्यालय येथील वळण रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने या ठिकाणी दुचाकीस्वारांचा अपघात होत असतो. पामबीच मार्गावरील प्रमुख अशा अरेंजा कॉर्नर चौकात वाहतूक नियंत्रक चौकीसमोर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. तर कोपरखैरणेच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याची साइड पट्टीवर अंथरलेली खडी आणि गटारावरील खचलेले झाकण वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. पामबीच मार्गावरून सानपाडा सोनखार परिसरात शिरताना मध्यभागी पडलेल्या खड्ड्यात वाहने आदळून मोठे नुकसान होत आहे. जुईनगर चिंचोली तलाव ते रेल्वे फाटकापर्यंतच्या रस्त्यावर प्रत्येक चौकात एकतरी खड्डा प्रवाशांच्या स्वागताला आहे. पावसाचा जोर कमी झाला असताना पालिकेने खड्डे बुजवल्यास नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, असे दुचाकीस्वार सचिन घरत यांनी म्हटले आहे.
अर्धा रस्ता काँक्रीट तर बाकी डांबरी
शिरवणे शाळेशेजारील वळणावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अर्धा रस्ता काँक्रीट तर बाकीचा डांबरी असल्याने त्या ठिकाणी नक्की वाहन कसे चालवावे, हा प्रश्न चालकाला पडतो. अर्धवट राहिलेल्या काँक्रीट रस्त्याची एका बाजूने लोखंडी सळी बाहेर आल्याने या ठिकाणी अपघात झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.