IND vs ENG : एजबेस्टन कसोटी सामन्याच्या विजयाचा WTC गुणतालिकेवर असा परिणाम, इंग्लंडला फटका
GH News July 07, 2025 01:07 AM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत भारताने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. लीड्स कसोटी सामना गमावल्यानंतर एजबेस्टन कसोटीत जबरदस्त कमबॅक केलं आहे. भारताने पहिला कसोटी सामना गमवल्याने गुणतालिकेत शून्य गुण होते. तर इंग्लंडला पहिल्याच विजयामुळे जबर फायदा झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात भारताने सर्व हिशेब चुकता केला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. भारताने इंग्लंडला पराभूत केल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणातालिकेत इंग्लंडसह तिसरं स्थान पटकावलं आहे. इंग्लंड आणि भारत या निकालानंतर समान स्थितीवर आले आहेत. भारताने दोन सामन्यापैकी एक जिंकला आणि एक गमावला आहे. त्यामुळे 12 गुणांसह विजयी टक्केवारी 50 टक्के आहे. तर इंग्लंडला या पराभवाचा फटका बसला आहे. इंग्लंडची विजयी टक्केवारी 100 हून 50 वर आली आहे.

ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. यामुळे ऑस्ट्रेलियाचे 12 गुण असून विजयी टक्केवारी ही 100 टक्के आहे. तर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने विजय मिळवला. एका सामन्यात विजय आणि एक सामना ड्रॉ झाला. त्यामुळे श्रीलंकेची विजयी टक्केवारी ही 66.67 टक्के आहे. दरम्यान, बांग्लादेशचा संघ या यादीत घसरला आहे. बांगलादेशचे 4 गुण असून विजयी टक्केवारी ही 16.67 टक्के आहे. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज दुसरा कसोटी सामन्याचा निकाल लागल्यानंतर या गुणतालिकेत फरक दिसून येईल.

भारत आणि इंग्लंड दुसरा कसोटी सामना

दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली. भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या. यात कर्णधार शुबमन गिलने 269 धावांची खेळी केली. पण प्रत्युत्तरात इंग्लंडने सर्वबाद 407 धावा करत फॉलोऑन टाळला. भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडची बेजबॉल रणनिती पाहून 427 धावा करत डाव घोषित केला. तसेच इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांवर आटोपला. भारताने हा सामना 336 धावांनी जिंकला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.