भारतीय कसोटी संघाने रविवारी 6 जुलै रोजी शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 336 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशा फरकाने बरोबरी साधली. त्यानंतर काही मिनिटांनेच टीम मॅनेजमेंटने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
उभयसंघातील या तिसऱ्या कसोटी सामन्याला 10 जुलैपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तिसऱ्या सामन्यासाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तिसऱ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन याचा समावेश केला आहे. या व्यतिरिक्त टीममध्ये कोणताही बदलाव करण्यात आलेला नाही. इंग्लंडकडून पराभवानंतर काहीच मिनिटांत या खेळाडूला संधी देण्यात आली. बॉलिंग युनिटची ताकद वाढवण्यासाठी गस ॲटकिन्सन याचा समावेश करण्यात आला आहे. आता गसला तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली जाते का? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचंही लक्ष असणार आहे.
गस ॲटकिन्सन याने आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकीर्दीत लॉर्ड्समध्ये 2 सामने खेळले आहेत. गसने या 2 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. इतकंच नाही तर गसने या मैदानात शतकही झळकावलं आहे. गसने 12 सामन्यांच्या कसोटी कारकीर्दीत एकूण 55 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान तिसऱ्या सामन्यातून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर कमबॅक करु शकतो. जोफ्राने कौटुंबिक कारणामुळे दुसऱ्या सामन्याआधी संघाची साथ सोडली होती. मात्र काही तासांनी जोफ्रा पुन्हा इंग्लंड टीमसह जोडला गेला. त्यामुळे जोफ्राला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. मात्र आता जोफ्रा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण किती बदल करते? हे सामन्याच्या काही वेळेआधीपर्यंत निश्चितच स्पष्ट होईल.
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाजाचा समावेश
तिसर्या कसोटीसाठी इंग्लंड क्रिकेट टीम : बेन स्टोक्स (कर्णधार), ओली पोप, जो रूट, बेन डकेट, झॅक क्रॉली, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स, शोएब बशीर, गस ॲटकिन्सन, जॉश टंग, जेमी ओवरटन आणि सॅम कुक.