Captain Shubman Gill : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलने शतके झळकावल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाचे खातेही उघडले. टीम इंडियाचा नवा कर्णधार बनवण्यात आलेल्या शुभमन गिल याने हा विजय मिळवताना विक्रम केला. ज्या मैदानावर टीम इंडियाला यापूर्वी यश मिळाले नव्हते, त्याठिकाणी विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या ऐतिहासिक कसोटीपूर्वी भारतीय कर्णधार शुभमन गिल एक असा खेळ खेळला होता ज्याचा प्रभाव त्याला सामन्यानंतरही जाणवत राहिला. संघाच्या विजयानंतर ही माहिती समोर आली.
चेतेश्वर पुजारासमोर केला खुलासामालिकेत पहिल्यांदाच टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिल याने पहिल्या सामन्यापासूनच आपली फलंदाजीची चमक दाखवली आहे. पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर या स्टार फलंदाजाने या कसोटीतही दमदार फलंदाजी केली. पहिल्या डावात २६९ आणि दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कारही घेतला. गिल याच्या या खेळीमुळे अनेक विक्रम नोंदवले गेले.
कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी शुभमन गिल याने एक अशा खेळ खेळला होती की, त्याचा प्रभाव सामना संपल्यानंतरही राहिला. शुभमन गिल याने त्या खेळाचा उल्लेख चेतेश्वर पुजारा याच्यासोबत झालेल्या मुलाखतीत केला. ब्रॉडकास्टर सोनी स्पोर्ट्सच्या मुलाखतीत पुजारा याने जेव्हा शुभमन गिल याला विचारले की, रिकाम्या वेळेत तो आणि संघातील इतर खेळाडू काय करतात? तेव्हा गिल याने सांगितले की, आम्ही ‘पेंट बॉल’ नावाचा खेळ खेळायला गेला होता. मी पहिल्यांदाच हा खेळ खेळत होतो. या खेळात चेंडू इतक्या वेगाने येतो, त्याची माहिती मला नव्हती. तो चेंडू मला दोन-तीन वेळा लागला. माझ्या शरीरावर अजूनही त्याच्या खुणा आहेत. तसेच त्या ठिकाणी वेदनाही होत आहेत.
गिल याने हा प्रकार सांगताच पुजारा याला हसू थांबवता आले नाही. गिल याने हे गुपित सांगितल्यावर दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य आणि आनंद होता, तो भारताच्या विजयामुळे. अर्थात शुभमन गिल याच्या शरीरावर झालेली दुखापत फार गंभीर नसेल. त्यामुळे तो एजबॅस्टनमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करू शकला. आता भारतीय कर्णधार १० जुलैपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार कामगिरी करुन मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे.