राज्यात अतिवृष्टीचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात अलर्ट? रेल्वेची स्थिती काय? जाणून घ्या
Tv9 Marathi July 07, 2025 03:45 PM

महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यभर पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे सध्या राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. या सततच्या पावसामुळे नोकरदार वर्गाला सर्वाधिक फटका बसला आहे. कारण मुंबई लोकल काही मिनिटे उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतोय.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील सहाही धरणांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. पुणेगाव धरण ७५ टक्के भरले आहे. त्यातून उनंदा नदीत १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे वणी आणि चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेला वाल्हेरी धबधबा प्रवाहित झाल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पावसामुळे सातपुडा परिसर निसर्गरम्य बनला आहे. वाल्हेरी धबधबा सुरू झाल्याने नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक आनंद घेण्यासाठी येत आहेत. मात्र, प्रशासनाकडून येथे कोणतीही उपाययोजना नसल्याने अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पर्यटकांकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जात आहे.

भंडारा जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’

हवामान खात्याने आज भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कालही भंडारा जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. आज ‘ऑरेंज अलर्ट’ असल्याने दिवसभर संततधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, नाशिक आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

तसेच उद्या ८ जुलै रोजी रत्नागिरी, गोंदिया आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच कोल्हापूर आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच तळ कोकणासह पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ‘यलो अलर्ट’ असून, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचाही यात समावेश आहे.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या मुंबई लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना त्रास सहन करावा लगात आहे. विशेषतः कोकण रेल्वे मार्ग आणि घाटमाथ्यावरील रेल्वे मार्गांवरील रेल्वे उशिराने धावत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.