Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे
esakal July 07, 2025 07:45 PM
Mumbai Live : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

आम्ही मराठीसाठी एकत्र आलो. त्याचं सर्वांनी स्वागत केलं. मात्र, भाजपाच्या बुडाला आग लागली आहे. ते आम्ही समजू शकतो. भाजपा हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत. लोकांची घरं फोडून राजकारण करणं ही भाजपाची सवय आहे.

Pune Live : शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या, वसंत मोरे यांचं दुबे यांना आव्हान

अँकर: हातात बांबू घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना आव्हान दिलं आहे. माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, हा फक्त बांबू नाही याआधी देखील हातोड्याचा वापर केला आहे. मारण्याची भाषा कोणी करत असेल तर उद्धव साहेब राज साहेब यांच्याकडे जाण्याआधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अंगावर या. मातोश्री आणि शिवतीर्थ लांबच राहिलं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे या मग आम्हाला जे करायचं आहे ते सांगतो असं आवाहन वसंत मोरे यांनी दिलं आहे.

Maharashtra Live : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं शाळा बंद आंदोलन

राज्यातील अंशतः विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्पा मंजूर झाला असतानाही जाणीवपूर्वक ते अनुदान शासन देत नसल्याचा आरोप करीत उद्यापासून राज्यातील अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटना आणि संस्थाचालक संघटना शाळा बंद ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र एक परिपत्रक काढण्यात आलेला आहे, त्या परिपत्रकाला आम्ही केराची टोपी दाखवत आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या आझाद मैदानात आंदोलनासाठी सगळे जमायचे आहे शासनाला काय कारवाई करायचे ते करू दे अशी भूमिका शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

Nanded Live : आमदार संजय गायकवाडांच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी राजे तसेच महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळलीय.नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

Pune Live : पुण्यात २६ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त – पोलिसांची मोठी कारवाई

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल २६ लाख रुपयांच्या ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. कोंढवा परिसरातून १५ लाख रुपयांचे अफिम तर बिबवेवाडीमधून ११ लाख रुपयांचे एम.डी. (मेथेड्रॉन) या कारवाईत हस्तगत करण्यात आले. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Kolhapur Live : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कोल्हापुरात आक्रमक झाली आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ, कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मावळ्याच्या वेशातील कार्यकर्त्यांनी घोड्यावर बसून, संजय गायकवाड यांच्या पोस्टरला घोड्याच्या टापांखाली तुडवून तीव्र नाराजी व्यक्त केली.

Hinjawadi IT Park Live : हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडी

हिंजवडी आयटी पार्क हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, फेज 2 आणि फेज 3 च्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे आयटी क्षेत्रातील अभियंत्यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम कामाच्या वेळेवर आणि उत्पादकतेवर होत आहे. त्यामुळे हिंजवडीतील वाहतूक नियोजनाचा गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे.

chhatrapati sambhaji nagar Live : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाची पातळी सध्या ५०% झाली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाची पातळी सध्या ५०% झाली असून, सध्या १६,२९५ क्यूसेक वेगाने धरणात पाण्याची आवक सुरू आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.

Ghatkopar Live : घाटकोपर पूर्व येथील पालिकेच्या टिळक मार्ग मनपा शाळेत पालक, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्त आंदोलन करण्याच्या तयारीत

घाटकोपर पूर्व येथील पालिकेच्या टिळक मार्ग मनपा शाळेत पालक, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्त आंदोलन करण्याच्या तयारीत

ही शाळा बंद करून दोन किमी लांब शाळेत विद्यार्थी पाठविण्याचा प्रशासनाचा निर्णय

या विरोधात पालक आणि पक्षाचे कार्यकर्ते शाळेसमोर एकत्र येण्यास सुरुवात

Palghar Live : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

ईव्हीएम मशीनवर मतदान नको म्हणून मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन केले आहे

Pune Live : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

हिंजवडीमध्ये १८ तासांपासून वीज पुरवठा खंडित आहे. याचा ९१ पेक्षा जास्त कंपन्यांना फटका बसला आहे

Mumbai Live: घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा २० मिनिटे ठप्प, प्रवाशांचा संताप

- घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो मार्गावरील एका गाडीत सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो सेवा काही काळासाठी रद्द करण्यात आली होती.

- त्यामुळे सुमारे २० मिनिटे मेट्रो सेवा ठप्प झाली होती.

- याचा फटका सकाळी कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना बसला.

- स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. नंतर हा बिघाड दुरुस्त करून मेट्रो सेवा पुन्हा पूर्वपदावर आणण्यात आली.

- मात्र, कामाच्या वेळेत सेवा रखडल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.

Santosh Deshmukh Case Live:संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

- संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरुवात विशेष सरकारी वकील उज्वल निकम न्यायालयात दाखल.

- आरोपी वाल्मीकरांच्या दोष मुक्तीच्या अर्जावरती रिप्लाय गोमट होणार.

- संतोष देशमुख हत्या प्रकरणाची नववी सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात होत आहे.

Chandori Rain Live Update: चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर, दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

- हे पूराचे पाणी निफाड तालुक्यातील चांदोरी येथे गोदावरी नदीपात्रा बाहेर आल्याने खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

- गोदावरी नदीकाठी न जाण्याचा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

Nashik Live Update: नाशिक शहर आणि जिल्ह्यात सलग पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता

नाशिक शहर आणि जिल्ह्यात सलग पावसामुळे गोदावरी नदीला पूरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai Live Update: मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

मुंबईकरांना सोमवारी सकाळी मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागलं. मोनो रेल्वे मार्गावरची वाहतूक अचानक बंद झाली असून, मेट्रोमध्ये देखील तांत्रिक बिघाड झाल्याने शहरातील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.

चेंबूर-वडाळा मार्गावर धावणारी मोनो रेल्वे सेवा आज सकाळपासूनच बंद आहे. प्रवाशांनी स्टेशनवर पोहोचल्यावर अचानक सेवा बंद असल्याचं समजल्याने संताप व्यक्त केला. काही वेळातच सोशल मीडियावर यासंबंधी तक्रारींचा पाऊस पडू लागला. अद्याप मोनो रेल्वे प्रशासनाकडून बिघाडाचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

Mumbai Live Update: मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता

मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, अधूनमधून ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. भरती - सकाळी १०:०४ वाजता - ३.७० मीटर. ओहोटी - दुपारी ४:०६ वाजता - २.४० मीटर. भरती रात्री ९:३६ वाजता - ३.१६ मीटर. ओहोटी - मध्यरात्रीनंतर ३:४३ वाजता (उद्या, ८ जुलै २०२५) - १.१२ मीटर

Live Update: पंढरपुर-बुलढाणा मार्गावर बसचा भीषण अपघात, ३० भाविक जखमी

पंढरपुरवरुन परतांना बसचा अपघात झाल असून ३० भाविक जखमी झाले आहेत.

Live Update: शिरुरमध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला

शिरुरमध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे.

Palghar Live : पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी

राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गरज असेल तरच बाहेर पडण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Bacchu kadu Live : बच्चू कडूंची आज पासून 'सातबारा कोरा' पदयात्रा

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू हे आजपासून 'सातबारा कोरा' पदयात्रा सुरु होणार असून पंजाबराव देशमुख यांच्या जन्मस्थानापासून ही यात्रा सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे.

Pune Live : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

एका विकृत व्यक्तीने पुणे स्टेशन परिसरात असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर चढून तो पुतळा तोडण्याचा व विद्रुप करण्याचा प्रयत्न रात्री घडला. त्या विकृत व्यक्तीला अटक केली असून आज सकाळी 11 वाजता पुणे रेल्वे स्टेशन स्थित असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ एकत्र जमून पुतळ्याचे संरक्षण त्याच बरोबर त्याची पावित्र व गरिमा ही सांभाळली गेली पाहिजे या करिता आपण पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण निषेध आंदोलन करणार आहेत.

Pune-Bangalore Highway Accident : हिरेबागेवाडीजवळ ५ वाहने एकमेकांवर आदळून दोघे ठार

बेळगाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडकोळ्ळमठाजवळ भीषण साखळी अपघात होऊन दोघे ठार झाल्याची घटना घडली. शिवाप्पा चंबाप्पा शहापूर (रा. हुबळी), रफिक बशीरअहमद जांबोटी (रा. नंदगड) अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात आणखी सहा जणांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Pune News : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न, एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यातील रेल्वे स्टेशनवरील घटना : सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीने रेल्वे स्टेशनच्या जवळील गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न केला. हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.

Navi Mumbai APMC Fire : नवी मुंबईत APMC शेजारील ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग, आठ ते दहा ट्रक-टेम्पो जळाल्याची शक्यता

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शेजारी असलेल्या एका ट्रक ट्रमिनलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलीये. या आगीत 8 ते 10 ट्रक, टेम्पो जळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय.

Karnataka Political News : काँग्रेस मागासवर्गीय परिषदेच्या अध्यक्षपदी सिद्धरामय्यांची निवड

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची मागासवर्गीयांसाठीच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी अचानक नियुक्ती झाल्याने राजकीय उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे. राज्यात काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडतील, तसेच नेतृत्वातही बदल होईल, अशी अटकळ राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा बांधली जात आहे.

Karnataka News : केंद्रात-गोव्यात भाजप असताना म्हादई प्रश्न का सुटला नाही?

बंगळूर : गोवा आणि केंद्रात भाजपचे सरकार असूनही, म्हादई समस्या का सोडवली गेली नाही? प्रथम केंद्रीय मंत्री कुमारस्वामींना त्यांचा शब्द पाळण्यास सांगा. त्यांना केंद्र आणि तामिळनाडूशी बोलण्यास सांगा आणि प्रकल्पासाठी परवानगी देण्यास सांगा, असे वक्तव्य कृषी मंत्री एन. चालुवरायस्वामी यांनी केले आहे.

Kolhapur Rain News : पंचगंगेच्या पाणी पातळीत अर्ध्या फुटाने घट; अद्याप २९ मार्ग बंद, ४८ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप राहिली, तर धरणक्षेत्रात दिवसभर हजेरी लावली. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत दिवसभरात अर्ध्या फुटाने घट झाली; परंतु अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली असून, २९ मार्ग बंद आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

Weather Update News : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे. आज (ता. ७) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, उतर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार सरींची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

CM Devendra Fadnavis News : 'महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी शक्ती दे'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाला घातले साकडे

Latest Marathi Live Updates 7 July 2025 : ‘‘महाराष्ट्राची काळजी घेणे हे विठू माऊलीचे काम आहे. म्हणून महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता मला शक्ती द्यावी आणि सर्वांना सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी,’’ असे विठुरायाच्या चरणी साकडे घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या मतदार यादी पडताळणीला प्रचंड राजकीय विरोध होत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने एक पाऊल मागे घेतले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर उद्योजक एलॉन मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे. आज (ता. ७) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप राहिली, तर धरणक्षेत्रात दिवसभर हजेरी लावली. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत दिवसभरात अर्ध्या फुटाने घट झाली. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.