गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांमुळे सतत चर्चेत आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी परळीतील गोट्या गिते सदस्य असलेल्या रघुनाथ फड या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र दोन आरोपी अजुनही फरार आहेत. मात्र यातील एक आरोपी धनराज फड सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
धनराज फड हा सतत संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड यांचे फोटो आणि रील सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने अशाच काही फेसबुक पोस्ट केल्या आहेत. ज्यामध्ये वाल्मीक कराडच्या फोटोंचा समावेश आहे. तसेच तो व्हाट्सअप वापरत असून परळीत खुलेआम फिरत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुत्रधार वाल्मीक कराड सरेंडर होताना आणि त्यानंतर विविध ठिकाणी फिरून आरोपींना मदत करणारा गोट्या गिते देखील परळीत फिरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे बीड पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हे सराईत आणि मकोका अंतर्गत कारवाई झालेले गुन्हेगार सोशल मिडिया वापरत मोकाट फिरत आहेत, मात्र पोलीस त्यांच्यापर्यंत का पोहोचू शकत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. आता या आरोपींना अटक कधी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, या आरोपींनी परळीत शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर हल्ला करत त्यांना लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करत गंभीर जखमी केले होते. तसेच सातभाई यांच्याकडील दोन लाख 70 हजार रुपये हिसकावून घेतले होते, याप्रकरणी रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गित्ते या पाच जणांना अटक झाली होती. तर धनराज फड आणि गोट्या गित्ते हे फरार आहेत.