पृथ्वी शॉ,सलामीवीर फलंदाज. पृथ्वीने त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला. पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमधील झंझावातानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपली छाप पाडली. पृथ्वीने 2018 साली कसोटी पदार्पणात शतक झळकावलं आणि साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पृथ्वीने केलेल्या कामगिरीमुळे त्याची काही वर्षांपूर्वी दिग्गज सचिन तेंडुलकर याच्यासह त्याची तुलना करण्यात आली. मात्र गेल्या काही वर्षांत पृथ्वीच्या क्रिकेट करियरला उतरती कळा लागली.
आरोग्याकडे दुर्लक्ष, शिस्तीचा अभाव, क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरी आणि वैयक्तिक आयुष्यातील वाद यामुळे पृथ्वी गेल्या काही वर्षांत मुख्य प्रवाहापासून दूर गेला. त्यामुळे पृथ्वीचा भविष्यात विनोद कांबळी होऊ नये, अशी भीती क्रिकेट चाहत्यांकडून वर्तवण्यात आली. पृथ्वीला त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) कुणीली आपल्या टीममध्ये घेतलं नाही.त्यामुळे पृथ्वीला अनसोल्ड रहावं लागलं. इतकंच काय, तर पृथ्वीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघातूनही अनेकदा वगळण्यात आलं. पृथ्वीला वारंवार संधी देण्यात आली. मात्र पृथ्वी स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आता पृथ्वीने करियर वाचवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
पृथ्वी शॉ आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे. पृथ्वीने अधिकृतरित्या महाराष्ट्र संघात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. एमसीए अध्यक्ष (Maharashtra Cricket Association) आणि आमदार रोहित पवार यांनी पृथ्वीला 100 नंबर असलेली महाराष्ट्र टीमची जर्सी देऊन त्याचं स्वागत केलं. पृथ्वीने यासह नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पृथ्वी टीम इंडियाचा आघाडीचा विकेटकीपर फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यासह महाराष्ट्र संघासाठी खेळताना दिसणार आहे.
पृथ्वी शॉ याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 58 सामन्यांमध्ये 46.02 सरासरीने 4 हजार 556 धावा केल्या आहे. पृथ्वीने या दरम्यान 13 शतकं आणि 18 अर्धशतकं ठोकली आहेत.
तसेच पृथ्वीने लिस्ट ए क्रिकेटमधील 65 सामन्यांमध्ये 55.72 च्या सरासरीने 3 हजार 399 धावा जोडल्या आहेत. पृथ्वीने 117 टी 20 सामन्यांमध्ये 25.01 च्या सरासरीने 2 हजार 902 धावा केल्या आहेत.
पृथ्वीची महाराष्ट्र टीममध्ये एन्ट्री
तसेच पृथ्वीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं 5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 1 टी 20i सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. पृथ्वीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 25 जुलै 2021 रोजी खेळला होता. तेव्हापासून पृथ्वी टीम इंडियापासून दूर आहे. त्यामुळे आता पृथ्वी नव्या संघाकडून खेळताना कशी कामगिरी करतो? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.