पावसाळा हा ऋतू जितका आनंददायक असतो, तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण करणारा ठरू शकतो, विशेषतः लहान मुलांसाठी. हवामानातील अचानक बदल, उष्णता आणि आर्द्रतेतील चढ-उतार यामुळे लहानग्यांना सहज आजार होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी या काळात अधिक जागरूक राहून मुलांची काळजी घ्यायला हवी. परंतु अनेकदा काही लहान पण महत्त्वाच्या चुका मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात.
1. पावसात भिजणे अनेक वेळा अनावश्यक असते. काही वेळा मुलांचे कपडे पूर्णपणे भिजत नाहीत, फक्त किंचित ओले होतात. अशा वेळी बऱ्याच पालकांना वाटते की कपडे बदलण्याची गरज नाही. परंतु अशा थोडक्याच ओल्या कपड्यांमुळेही सर्दी, ताप, खोकला यांसारख्या त्रासाला सुरुवात होते. त्यामुळे भिजले असोत वा थोडेसेच ओले असोत, मुलांचे कपडे वेळेत बदला हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
2. बर्याच पालकांना वाटतं की हलकासा पाऊस असला तर मुलांना बाहेर खेळू द्यायला हरकत नाही. पण हा गैरसमज आरोग्याला महागात पडू शकतो. पावसात उगम पावणारे सूक्ष्म जंतू आणि कीटक त्वचेशी संपर्क साधून अॅलर्जी, त्वचाविकार किंवा इतर संसर्गाचे कारण ठरतात. त्यामुळे हलक्या पावसातही मुलांना बाहेर जाण्यापासून रोखा किंवा त्यांच्यासाठी रेनकोट, गमबूट यांसारखी संरक्षणात्मक वस्त्रांची व्यवस्था करा.
3. थंड हवामानात थंड पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. विशेषतः लहान मुले थंड पाण्यामुळे त्वरीत आजारी पडतात. त्यामुळे पावसाळ्यात नेहमी कोमट पाण्याचा वापर करून मुलांना आंघोळ घालावी. यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता संतुलित राहते आणि संसर्ग टाळता येतो.
4.पावसाळा म्हणजे मच्छरांचा मोसम. घरात आणि घराच्या आजूबाजूला साचलेले पाणी हे मच्छरांच्या प्रजननासाठी योग्य ठिकाण असते. या मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे घरी मच्छरदानी, रिपेलंट्स, मच्छरनाशक क्रीम्स किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरा. संध्याकाळच्या वेळी मुलांना फुल बाह्यांचे कपडे घालायला लावा.
5. पावसाळ्यात हातपाय वारंवार स्वच्छ धुणे, खाण्या-पीण्याची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. मुलांना गरम अन्न, ताजे फळे देऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. घराबाहेर खाणं टाळा. बर्फाचे पदार्थ, उघड्यावरचे फूड, अशा गोष्टींमुळे पोटदुखी, जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)