ENG vs IND : हरले पण माजोरडेपणा कमी झाला नाही, बेन स्टोक्स पराभवानंतर म्हणाला..
GH News July 07, 2025 04:09 PM

टीम इंडियाने इंग्लंडवर एजबेस्टमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 336 धावांनी धुव्वा उडवत पहिला विजय मिळवला. भारताने यासह या मैदानातील पहिलावहिला कसोटी विजय मिळवला. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 58 वर्षांची प्रतिक्षा संपवली. भारताने 1967 साली या मैदानात पहिला सामना खेळला होता. मात्र याआधीच्या 8 पैकी 7 सामन्यात भारताला पराभूत व्हावं लागलं होतं. तर 1 सामना अनिर्णित राखण्यात यश मिळालं होतं. मात्र शुबमसेनेने जे गेल्या अनेक दिग्ग्जांना जमलं नाही ते करुन दाखवलं.

भारताने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याशिवाय हा सामना जिंकला. बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या जोडीने 20 पैकी 17 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडचं कंबरडं मोडलं. तसेच शुबमनने नेतृ्त्वासह फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 269 तर दुसऱ्या डावात 161 धावा केल्या. तर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला ऑलराउंडर म्हणून काहीच करता आलं नाही. बेन स्टोक्स या पराभवानंतर काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.

बेन स्टोक्स काय म्हणाला?

“बेन स्टोक्स याने भारताच्या वेगवान गोलंदाजीबाबत प्रतिक्रिया दिली. मी त्याबाबत चिंता करणार नाही. आम्ही शक्य तितके प्रयत्न केले, रणनिती बदलली, मात्र प्रतिस्पर्धी संघ वरचढ ठरतो तेव्हा मुसंडी मारुन कमबॅक करणं अवघड होतं. भारत जागतिक पातळीवरील संघ आहे. शुबमन गिल याने शानदार कामगिरी केली”, असं म्हणत स्टोक्सने शुबमनच्या बॅटिंगचं कौतुक केलं.

“खेळाडू विशेष करुन जेव्हा शारिरीक आणि मानसिकरित्या थकलेले असतात तेव्हा दिवसाच्या शेवटी बॅटिंग करणं अवघड होतं. मात्र आम्हाला अशा स्थितीचा सामना पुन्हा करावा लागू शकतो. त्यामुळे आम्हाला या अशा स्थितीची सवय करुन घ्यायला हवी”, असं स्टोक्सने नमूद केलं.

जेमी स्मिथबाबत स्टोक्स म्हणाला..

“जेमी आमच्यासाठी कमाल करतोय. जेमीने बॅटिंगसह शानदार कामगिरी केली. तसेच विकेटीकीपर म्हणून तो त्याची भूमिका शांतीत पार पाडतोय. जेमी आणि हॅरी ब्रूक या दोघांनी इंग्लंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही जिंकू शकलो नाहीत. मात्र आता काही दिवस विचार करण्यासाठी वेळ आहे. हा आठवडा अवघड राहिला. मात्र आम्ही लॉर्ड्समध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु”, अशी आशा स्टोक्सने व्यक्त केली.

दरम्यान इंग्लंडला 608 धावांचा पाठलाग करताना ऑलआऊट 271 पर्यंतच पोहचता आलं. भारतासाठी शुबमन गिल याने पहिल्या डावात 269 तर दुसऱ्या डावात 161 धावा केल्या. तसेच आकाश दीप याने दोन्ही डावात मिळून एकूण 10 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 7 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता उभयसंघातील तिसरा सामना हा 10 जुलैपासून लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.