मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? देवेंद्र फडणवीस म्हणाले
Tv9 Marathi July 08, 2025 06:45 PM

महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषेवरुन वाद सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणानंतर काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेकडून आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चाला मीरा भाईंदर पोलिसांनी परवानगी नाकारली. यानंतर सध्या मीरा भाईंदरमध्ये रस्त्यावर उतरलेल्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी का नाकारली याबद्दलची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसेच्या मोर्चाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. आपण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तरी ती देतो. पण ते जाणूनबुजून असा मार्ग मागत होते, ज्यातून संघर्ष होईल. त्यामुळे मोर्चाला नकार दिला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली, याबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी मी पोलीस आयुक्तांना ही परवानगी का दिली नाही, असे विचारले आहे. “कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण त्याला परवानगी देतो. त्यावेळी मला आयुक्तांनी सांगितलं की तिथे मोर्चाचा मार्ग काय असणार याबद्दल चर्चा सुरु होती. परंतु ते जाणीवपूर्वक असा मार्ग मागत होते, ज्यातून संघर्ष होईल. त्यावेळी पोलिसांनी जो नेहमी मार्ग असतो, तो मोर्चासाठी घ्या, अशाप्रकारचा मार्ग घेऊ नका. त्यांनी या गोष्टीला नकार दिला. आम्ही हाच मार्ग घेणार”, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

मोर्चा काढण्यास कोणाचीही हरकत नाही – देवेंद्र फडणवीस

मीरा-भाईंदरमधील व्यापारी मोर्चावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. “व्यापारी मार्गाने जो मार्ग निश्चित केला होता, त्याच मार्गावर मोर्चा निघाला. मोर्चा काढण्यास कोणाचीही हरकत नाही, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत असेल, तर पोलीस कारवाई करतात. महाराष्ट्रामध्ये कुणीही मोर्चा काढू शकते. पण अनेकदा जमाव अनियंत्रित होऊन चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळेच पोलिसांनी परवानगी नाकारली”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मी महाराष्ट्राला ओळखतो, असे इथे चालणार नाही. भारतावर जेव्हा जेव्हा हल्ला झाला, तेव्हा मराठी माणसाने नेहमी देशाचा विचार केला आहे.” असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.